नळदुर्ग -: मराठवाड्यातील नळदुर्ग (जि. उस्मानाबाद) येथील इतिहासप्रसिध्द किल्ल्यातील व स्थापत्य शास्त्रातील अदभूत चमत्कार समजला जाणारा ‘नर-मादी’ उर्फ जलमहाल हा धबधबा तब्‍बल तीन वर्षानंतर शुक्रवार दि. 20 सप्‍टेंबर रोजी सकाळपासून सुरु झाला आहे. त्‍यामुळे आतुरतेने वाट पाहणा-या पर्यटकांची गेल्या तीन वर्षांपासूनची प्रतीक्षा अखेर संपली आहे. पर्यटक व निसर्गप्रेमी नागरिकांतून धबधबा पाहण्‍यास मोठी गर्दी होत आहे.
पावसाळ्यात येणा-या पर्यटकांचे खास आकर्षण म्हणून ओळखले जाणारे ऐतिहासिक किल्ल्यातील पाणी महालावरील धबधबे आणि किल्ल्याच्या पश्चिमेला असलेला शिलक धबधबा शुक्रवार दि. 20 सप्‍टेंबर रोजी सकाळपासून वाहायला सुरुवात झाली. त्यामुळे पर्यटकांची गेल्या तीन वर्षांपासूनची प्रतीक्षा संपली. हे धबधबे पाहण्यासाठी आजपासूनच गर्दी वाढली. शहरातील ऐतिहासिक किल्ला, पाणी महालावरील नर-मादी या नावाने ओळखले जाणारे धबधबे, किल्ल्याच्या पश्चिमेला असणारा शिलक धबधबा आणि येथून २ किलोमीटरवर पूर्वेला असलेला रामतीर्थ मंदिर परिसरातील रामडोह धबधबा ही पर्यटकांची पावसाळ्यातील खास आकर्षणे होय. त्यामुळेच नळदुर्गला पावसाळ्यात ‘दक्षिणेतील काश्मीर’ म्हणून संबोधले जाते. यंदा वरुणराजाने चांगली हजेरी लावल्याने येथील बोरी धरण भरून सांडवा वाहायला सुरुवात झाली. या सांडव्याच्या पाण्याने बोरी नदीच्या पाण्याची पातळी वाढली आणि किल्ल्यातील धबधबे आज सकाळपासून कोसळू लागले. किल्ल्याच्या दक्षिण बाजूने वाहणा-या बोरी नदीचा एक फाटा किल्ल्याच्या आत वळवून त्यावर बंधारा बांधला आहे. तोच पाणी महाल होय. या बंधा-यात साठलेले अतिरिक्त पाणी वाहून जाण्यासाठी दोन सांडवे सोडण्यात आले आहेत. त्यालाच नर-मादी असे संबोधले जाते. या दोन सांडव्यांतून दीडशे-दोनशे फूट उंचीवरून कोसळणारे धबधबे, त्यातून उडणारे तुषार आणि त्यातून तयार झालेले सप्तरंगी इंद्रधनुष्य डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. किल्ल्याच्या पश्चिमेला बोरी नदीचा मूळ प्रवाह वाहतो. तेथे शिलक धबधबा असून पर्यटक या ठिकाणी आवर्जून हजेरी लावतात. पाणी महालावरील धबधबे, शिलक धबधबा आणि रामडोहचा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांचा ओघ वाढत आहे.
    सलग दोन वर्षे या भागात पर्जन्‍यमान म्‍हणावे तितके न झाल्‍याने दुष्‍काळग्रस्‍त परिस्थितीचा सामना नागरिकाना करावा लागला. तुळजापूर तालुक्‍याची पावसाची सरासरी 836 मि.मी. असून आजअखेरपर्यंत 718 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी 350 मि.मी. एवढया पावसाची नोंद झाली होती. यंदाच्‍या वर्षी बोरी धरण पाणलोट क्षेत्रात चांगले पाऊस झाल्‍याने तब्बल तीन वर्षानंतर सर्वत्र ओढे, नाले, तलाव तुडुंब भरून वाहत आहेत. श्री क्षेत्र तुळजापूरसह नळदुर्ग शहर व अणदूर गावाला पाणी पुरवठा करण्‍यात येणारे नळदुर्ग येथील कुरनुर मध्‍यम (बोरी धरण) प्रकल्‍प शुक्रवार दि. 20 सप्‍टेंबर रोजी पाण्‍याने तुडुंब भरुन वाहण्‍यास सुरुवात झाली. त्यामुळे धरणातील जास्‍त झालेले पाणी सांडव्‍याद्वारे बोरी नदीतून वाहत आहे. त्‍यामुळे नळदुर्ग किल्‍ल्‍यातील तीन वर्षापासून बंद असलेला नरमादी धबधबा शुक्रवार दि. 20 सप्‍टेंबर रोजीपासून चालू झाला आहे.
नळदुर्गच्‍या ऐतिहासिक किल्‍ल्‍यातील नरमादी धबधबा 2010 मध्‍ये सप्टेंबर महिन्यात धो धो कोसळला. ते तब्बल महिनाभर पर्यटकांना हे विलोभनीय दृश्य पाहण्याची संधी मिळाली होती. त्‍यावेळी सप्‍टेंबरच्‍या पहिल्याच आठवड्यात सुमारे दोन लाखापेक्षा अधिक पर्यंटकानी नळदुर्गला भेट दिली होती.
    नळदुर्ग किल्ल्यामधील जलमहाल असणारा बंधारा हे पर्यटकांचे आकर्षणाचे ठिकाण आहे. रणमंडळ आणि नळदुर्ग यांना जोडणार्‍या बंधार्‍यामध्ये जलमहाल आहे. या बंधार्‍याची उंची १९ ते २० मीटर उंच आहे. बंधार्‍यामध्ये चार मजले आहेत. बंधार्‍याच्या पोटातील या मजल्यामध्ये जाण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग आहे. बंधार्‍याच्या पोटामध्ये अर्ध्या उंचीवर हा जलमहाल बांधलेला असून याच्या खिडक्या नक्षीदार महीरपीने सजवलेल्या आहेत. याच्या भिंतीवर फारशी लिपीतील शिलालेख आहे. याचा अर्थ असा होतो की, या जलमहालाकडे दृष्टी टाकल्यास मित्रांचे डोळे प्रसन्नतेने उजळतील तर शत्रुचे डोळ्यापुढे अंधारी येईल. पावसाळ्यामध्ये पाणी वाढल्यावर या बंधार्‍यामधून वाहून जाण्यासाठी दोन मार्ग ठेवलेले असून त्यांना नर व मादी अशी नावे आहेत. नळदुर्ग किल्ला त्याची रचना, संरक्षण व्यवस्था, टेहाळणीचा उपळ्या बुरुज, त्यावरील लांब तोफ दरवाजाचा वक्राकार मार्ग यामुळे चांगलाच लक्षात राहतो.
 
Top