तुळजापूर : येथील नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे व त्यांचा सहकारी कर्मचारी भांडारपाल व लेखापाल यांनी एका ठेकेदाराकडून तीस हजार रुपयेची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून गुरुवार रोजी पकडले. 
    मुख्याधिकारी संतोष जिरगे (रा. हडको, तुळजापूर), भांडारपाल व लेखापाल प्रताप लुगाजी कदम असे रंगेहाथ पकडलेल्यांचे नावे आहेत. यातील योगेश विलासराव माळी यांनी तुळजापूर नगरपालिकेस पाईप व पाईपलाईन जोडणीचे साहित्य पुरवठा केले होते. त्यांचे दि. २९ ऑगस्ट रोजी पाच वेळा वेगवेगळ्या धनादेशाद्वारे २, लाख ५० पन्नास २८४ रुपयाचे बील अदा करण्यात आले होते. नगरपालिकेच्या खात्यात रक्कम शिल्लक नसल्याने तसेच न्यायालयाने नगर पालिकेचे खाते गोठविल्याने दळवी यांचे धनादेश वटले नाहीत म्हणून त्यांनी पंधरा दिवसापुर्वी पाचही धनादेश नगर पालिकेत जमा करुन नगर पालिकेच्या चालू असलेल्या खात्याचा धनादेश देण्याची विनंती केली.
    दळवी यांना २ लाख ५० पन्नास २८४ रुपयाचा नगर पालिका तुळजापूरचे चालू असलेल्या खात्यांचा धनादेश देण्यासाठी मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी ५० हजार रुपयांची मागणी केली. याबाबत दळवी यांनी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात सविस्तर तक्रार दाखल केली. पोलिस अधीक्षक संजय बाविस्कर, अप्पर पोलिस अधीक्षक पिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधिक्षक नईम हश्मी, यांनी संतोष जिरगे यांच्या हडको तुळजापूर येथील निवासस्थानी सापळा रचला असता तडजोडीअंती संतोष जिरगे यांनी तक्रारदार दळवी यांना ३५ हजार रुपयांची मागणी केली तेंव्हा समक्ष हजर असलेले भांडारपाल व लेखापाल प्रताप कदम यांनी तडजोड करुन ३० हजार रुपये मुख्याधिकारी संतोष जिरगे यांना आणून देण्यास सांगितले होते. त्यानुसार दि. ५ सप्टेंबर रोजी संतोष जिरगे यांनी त्यांच्या निवासस्थानी दळवी यांच्याकडून ३० हजार रुपये लाचेची मागणी करुन ते स्विकारल्यानंतर त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
    या कार्यवाहीत फौजदार व्ही.बी. सिद, अश्विनी भोसले, एफ.सी. राठोड, दुय्यम फौजदार चंद्रकांत देशमुख, दिलीप भगत, बालाजी तोडकर, राजाराम चिखलीकर, सुधीर डोरले, नितीन सुरवसे, नितीन तुपे यांचा सहभाग होता. पुढील तपास पोलिस उपअधीक्षक नईम हश्मी हे करत आहेत.
 
Top