तुळजापूर :- शारदीय नवरात्र महोत्सव व कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूर येथे येणा-या  भाविकांची गैरसोय होणार नाही, यादृष्टीने वाहतूक नियोजन करण्याचे निर्देश राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी दिले. 
          तुळजापूर येथे शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर येथील शासकीय विश्रामगृहात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या उस्मानाबाद विभागाच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. विविध शासकीय यंत्रणांच्या प्रमुखांनाही यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी श्री चव्हाण यांनी हे निर्देश दिले. राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे, खासदार डॅा. पद्मसिंह पाटील, नगराध्यक्षा विद्या गंगणे, तुळजापूर विकास प्राधीकरणाचे सदस्य नरेंद्र बोरगावकर व अप्पासाहेब पाटील, जिल्हाधिकारी  के. एम. नागरगोजे, जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, विभाग नियंत्रक प्रदीप खोबरे आदींची यावेळी उपस्थिती होती.
    सोलापूर, लातूर या लगतच्या जिल्ह्यासह कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातून भाविक श्री तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येतात. त्यांची गैरसोय होणार नाही यासाठी परिवहन विभागाने योग्य नियोजन करुन त्याप्रमाणे बसगाड्यांची व्यवस्था करावी. आपल्या परिवहन महामंडळ आणि कर्नाटक परिवहन महामंडळाने परस्पर समन्वयाने नियोजन करावे. बसेस या पार्किंगच्या ठिकाणीच लागतील हे पाहावे, अशा सूचना त्यांनी दिले. 
  गोरे यांनी बसस्थानकावर येणा-या प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचे आदेश दिले. मोठ्या संख्येने येणा-या महिला भाविकांची सुरक्षितता डोळ्यासमोर ठेवून आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
    पोलीस, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, नगरपालिका या यंत्रणांनी परस्पर समन्वयाने नियोजन करण्याच्या सूचना यावेळी पालकमंत्री चव्हाण आणि . गोरे यांनी दिल्या.     सुरक्षिततेत्या दृष्टीने भाविकांनी कोणतीही बॅग अथवा वस्तू मंदिरात घेऊन जावू नये, यासाठी संबंधित बसस्थानक तसेच पार्किंगच्या ठिकाणी वस्तू ठेवण्यासाठी लॅकर  रुमची व्यवस्था करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी . नागरगोजे यांनी दिल्या. . खोबरे यांनी मागील वर्षी एस.टी.ने केलेल्या नियोजनाची माहिती दिली. यावर्षी भाविकांची संख्या वाढणार हे गृहित धरुन विविध मार्गांवर बस फे-या  वाढविण्याबाबत नियोजन सुरु असून नवरात्र काळात द्वादशी ते दसरा(दि. 2 आक्टोबर ते 14 आक्टोबर) आणि द्वादशी ते प्रतिपदा (दि. 16 ते 19 आक्टोबर) अशा दोन सत्रात होणारी गर्दी लक्षात घेऊन वाहतूक नियोजन करण्यात येत असल्याचे सांगितले. या बैठकीस जिल्ह्यातील राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी तसेच सोलापूर व गुलबर्गा, हुमनाबाद येथील परिवहन मंडळाचे अधिकारीही उपस्थित होते.    
               
 
Top