औरंगाबाद - कंत्राटदाराकडून 50 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेले सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता गजानन खाडे यांच्या घरात आतापर्यंत दहा कोटींचे घबाड हाती लागले आहे.
       लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) झडतीत ही माहिती उघड झाली आहे. बँक खाती व लॉकर्समधील ऐवजाची माहिती मिळाल्यावर संपत्तीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, खाडे यांना न्यायालयाने 21 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
        खाडे यांची बँक खातीही तपासली जात आहेत. त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे खाते असलेल्या शहरातील 9, तर बीड व परभणी येथील प्रत्येकी 1 अशा 11 बँकांना पत्रे पाठवून खाती गोठवण्यात आली आहेत. संबंधित एसीबी कार्यालयांना सूचना लाचखोर खाडे यापूर्वी यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशीम, परभणी, बीड, कोल्हापूर येथे कार्यरत होते. तेथील कार्यकाळातील त्यांच्या कामांची माहिती जमवण्याचे काम सुरू आहे. या काळात त्यांनी खरेदी केलेल्या मालमत्तेची माहिती त्या त्या जिल्ह्यांतील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय व महसूल विभागाकडून घेतली जात आहे.

तीन आरडी व दोन पीपीएफ अकाउंट.
खाडे यांनी 1998 मध्ये तीन आरडी, तर दोन पीपीएफ अकाउंट उघडले होते. तिन्ही आरडी दरमहा हजार रुपयांच्या, तर पीपीएफ खात्यातही हजार रुपये जमा केले जात होते. ही खाती गोठवण्यात आली आहेत.

मुलाच्या नावे कंपनी..
भ्रष्टाचाराच्या पैशाची विल्हेवाट लावण्यासाठी खाडे यांनी मुलाच्या नावे भागिदारीत कन्स्ट्रक्शन कंपनी उभारली होती. सध्या ती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रडारवर असून, दोघांचेही जबाब घेण्यात येत आहेत. बीड बायपासवर सुधाकरनगरलगत गट क्रमांक 346 मध्ये अमोल कन्स्ट्रक्शन आणि मेसर्स संत रामदास कन्स्ट्रक्शनच्या नावे रो-हाऊसिंगचा फलक लावला होता. खाडे पकडले गेल्यानंतर बुधवारी रात्रीतून फलक काढण्यात आला. तरीदेखील योजना खाडे यांचीच असल्याची माहिती एसीबीला कळालेली आहे.

नक्षत्रवाडीतील फार्म हाऊसची झडती
कन्स्ट्रक्शन कंपनीवरील छाप्यात विविध बँकांची कागदपत्रे पोलिसांच्या हाती लागली आहेत. नक्षत्रवाडीतील फार्म हाऊसच्या झडतीत नातलगांच्या नावे असलेल्या मालमत्तेचा घेतला जात आहे. बोकूड जळगाव येथे दोन एकर शेतात बांधलेल्या बंगल्यावरील वॉचमनला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या बंगल्यातील कपाट उघडताच मोठे घबाड हाती लागण्याची शक्यता आहे.

निलंबनाची शक्यता
कोणताही सरकारी अधिकारी 48 तासांपेक्षा जास्त काळ पोलिस कोठडीत राहिल्यास नियमाप्रमाणे त्यास निलंबित केले जाते. मात्र, खाडे ‘अ’ दर्जाचे अधिकारी असल्याने त्यांच्या निलंबनाचे आदेश गुरुवारी सायंकाळपर्यंत बांधकाम खात्याच्या मुख्य अभियंत्याकडे आले नव्हते. शनिवारी त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपण्यापूर्वी हे आदेश येण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.

एवढी जमवली माया
0 31 लाख 33 हजार 845 रोख
0 1 किलो 312 ग्रॅम सोने (किंमत 39 लाख 56 हजार 930 रु.)
0 1 किलो 79 ग्रॅम चांदी (किंमत 64 हजार 725 रु.)
0 खंडेवाडी, गेवराई, पैठण रोडवर सहा प्लॉट, सातारा परिसरात चार, भावसिंगपुर्‍यात तीन प्लॉट
0 उस्मानपुरा येथील संजय हाउसिंग सोसायटीत 40 लाखांचा बंगला
0 पीरबाजारमधील व्यंकटेश अपार्टमेंटमधील 3.32 लाखांचे घर.
0 बाभुळगाव, गेवराईत 10 एकर 29 गुंठे शेती (2005ची खरेदी)
0 वाशीमच्या मंगरूळपीरमध्ये 4 हेक्टर, घारदौंड येथे 31 गुंठे शेती.
0 24 लाखांचे पोकलेन, 9.16 लाखांचा ट्रक, 6.95 लाखांचे ट्रॅक्टर, 4.5 लाखांचे काँक्रीट मिक्सर, दोन दुचाकी, एक कार

 * साभार : दिव्‍यमराठी
 
Top