शिकागो : प्रेम जुळल्यानंतर प्रेयसीला खुश ठेवण्यासाठी सर्वच प्रियकर हजारो रुपये खर्च करताना दिसतात. मात्र प्रेयसी शोधण्यासाठी लाखो रुपये खर्च करणारा प्रेमवीर सापडणे दुर्मिळच. अशाच एका अमेरिकन प्रेमवीराने प्रेयसीचा शोध घेण्यासाठी लाखो रुपये खर्चुन चक्क जाहिरातबाजी करीत "प्रेमासाठी वाटेल ते" या म्हणीला नवीन उंची दिली आहे. शिकागो शहराच्या विविध भागात झळकलेल्या भव्य होर्डिंग्जद्वारे त्याने प्रेयसीला आपल्यासोबत डेटवर येण्याचे निमंत्रण दिले आहे.
    हातात गिटार घेऊन उभा असलेला एक व्यक्ती व सोबत इंग्रजीतून मोठया अक्षरांमध्ये "मी गॉर्डन आहे, चला डिनरला" असे लिहिलेले होर्डिंग्ज शिकागोच्या गल्लीबोळात व चौकाचौकांमध्ये लागलेले सध्या बघायला मिळत आहे. हे बॅनर बघून एखादया गिटारवादकाच्या कार्यक्रमाची ही जाहिरात असावी असा गैरसमज होता. मात्र प्रत्यक्षा शिकागोत राहणा-या गॉर्डन एंगल या उदयोजकाने प्रेम मिळविण्यासाठी दिलेली ती जाहिरात आहे. ऑनलाईन डेटिंग साईटवरुन प्रेम मिळविण्यात अपयशी ठरल्यानेच प्रेम शोधण्यासाठी ही नवी शक्कल लढविल्याचे गॉर्डन यांनी सांगितले. आपण शिक्षण, घर, कार यासारख्या वस्तूंवर लाखो रुपये खर्च करतो. मात्र याहीपेक्षा सर्वाधिक गरजेचे असलेले प्रेम मिळविण्याच्या बाबतीत आपण कंजुषपणा का करतो असेही ते यावेळी म्हणाले. म्हणूनच प्रेम मिळविण्यासाठी ही गुंतवणूक केल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. ही जाहिरात बघून त्यांच्याकडे 15 ते 20 तरुणींचे प्रस्ताव दाखल झाले असून लवकरच त्यांना भेटणार असल्याचे गॉर्डन यांनी सांगितले. प्रेयसीच्या शोधासाठी लढविलेली ही शक्कल सोशल मीडियासह सगळीकडेच चर्चेचा विषय बनली आहे.
 
Top