गणपती बाप्पास....
बरं झालं गणपती बाप्पा तुमचं वाहन मुषक आहे
पेट्रोल आणि डिझेलचा भाव वाहनाला कुठे पोषक आहे
हेही बरं आहे तुमचं खादय फक्त उकडीचं मोदक आहे
देशातला पोषण आहार सगळयासाठीच बाधक आहे

बाप्पा काही शिकायचे झाल्यास मराठी शाळा शोधू नका
इंग्रजीच्या अटटाहासापायी शिवपार्वती वर डोनेशन लादू नका
बप्पा तुम्ही शिकण्यासाठी मदरशात ॲडमिशन घ्या
सरकार भरपूर अनुदान देते, हाती देश हिताचं मिशन घ्या

बप्पा दहा दिवसात तुम्ही स्वदेशी काही मागू नका
टिळक युगातल्यासारखं उगाच स्वदेशीच्या मागं लागू नका
बप्पा तुमच्या मागे-पुढे जुगार नसून केटी आहे
ते वाईट असलं तरी त्यातली कमाई मोठी आहे

बप्पा काही ठिकाणी मात्र समाजजागृतीचं काम असेल
पुढच्या वर्षी तेही नसणार, यावर्षीच त्यांच्यावर गोळी सुटेल
बप्पा इथे आल्यानंतर तुम्ही स्वत:ची काळजी स्वत: घ्या
आम्ही घराबाहेर पडत नाही, म्हणून गृहमंत्र्यांनाच वर्दी दया

बप्पा उंदरास दहा दिवस बांधून ठेवा, तोही पाक-चायना सारखा वागेल
नेभळट शेजारांच्या घरात घुसेल, नाहीतर सरकारच्या गोदामाकडे सुटेल
तिथे कितीतरी सडका माल असेल, बाजूला वाईनची फॅक्टरी असेल
तिथे जाऊन हा मनसोक्त ढोसेल आणि पक्का देशी तरुण भासेल

बप्पा येताना चलन आणू नका, किमान एक्सचेंज रुपयात मागू नका
पडत्या रुपयाशी कठोर वागू नका, अनिवासी भारतीयासारखं ठगवू नका
बरे झाले गणपती बप्पा तुम्ही दहा दिवसानंतर जाणार
महागाईनं वैतागलोय आम्ही, तुम्ही त्यापासून दुरावणार

बप्पा मिरवणुकीत तुम्हीही डोळे आणि कानावर हात धरा
तुम्ही फक्त निमुट बसा, आम्ही कुठे म्हणतोय फेर धरा
आम्ही कुठे म्हणतोय माफ करा.....

भगवंत सुरवसे
मो. 9763830982

 
Top