बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : सार्वजनिक गणोशोत्सव काळातील पुरुषांच्या मंडळाने सादर केलेल्या आरासाचे आपण कौतुक करतो, त्याला मोठ्या प्रमाणात प्रसिध्दीही देतो परंतु त्याच सणात गौरी लक्ष्‍मीचेही आगमन होते, गौरी लक्ष्‍मीसमोरील आरास करतांना माता भगिणी तन, मन आणि नवर्‍याच्या धनाने गौरी गणपतीचा उत्सव मोठ्या भक्तीमय वातावरणात साजरा करतात असे मत पालकङ्कंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. दिलीप सोपल यांनी व्यक्त केले.
    रविवारी सायंकाळी यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक सभागृहात पार पडलेल्या फोटोग्राफर्स असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या गौरी आरास स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारोहात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पोलिस उपनिरीक्षक सुरेखा धस, .पो.उ.नि.शोभा पडवळ, असोसिएशनचे अध्यक्ष राजेश वानखेडे, अंबादास कनकट्टी, सचिन रुद्रवार, सोमनाथ सेवकर, मनोज चिंचकर, अशोक नागरगोजे आदि उपस्थित होते.
    पुढे बोलतांना ना.सोपल म्हणाले, नवर्‍याचे धन म्हणण्यापेक्षा आता त्यावरही त्यांचाच हक्क आहे, कायद्यानेही त्यांना ५० टक्के आरक्षण व अधिकार दिले आहे. अत्यंत मनापासून गौरीसमोरील सजावट करुन इतरही स्नेही व मैत्रीणींच्या घरी जाऊन त्यांचेही कौतुक करत असलेल्यांकडे कोणी लक्ष देत नसतांना बार्शी फोटोग्राफर्स असोसिएशनने त्यांचे कौतुक करण्याचे महत्वाचे कार्य केल्याने व त्यांना न्याय दिल्याने त्यांचेही अभिनंदन केले पाहिजे.  पूर्वीच्या काळापासून बार्शी शहरातील फोटोग्राफर्सची परंपरा मोठी आहे, पूर्वी फसलकर, पराते, कांबोज, मुलगे, मनगिरे आदि ठराविकच फोटोग्राफर्स होते, त्यांच्या स्टुडिओत जाऊन फोटो काढण्याची पध्दत होती. चंद्र, जीप, कोट व टाय घालून काढलेल्या छायाचित्रांचे त्यावेळी अप्रुभ होते. पूर्वीच्या चित्रपटाचेही शुटींग बर्‍यापैकी स्टुडिओत होत, त्यानंतर जसाजास काळ बदलला नवनवे शोध लागले तसे बाग, सार्वजनिक बाग इत्यादी स्थित्यंतरे झाली आज बरीच क्रांती झाली आहे. पूर्वी टचिंग काढणे, डार्करुमही ऑपरेशन रुमसारखी होती, फोटो वाळविणे इत्यादी गोष्टी ऐकाव्या लागत पण आता मिनीटात फोटो तयार होण्याईतपत शोध लागले आहेत, चित्रपटामध्येही मराठी माणसांचा झेंडा लागला आहे, पूर्वीच्या फोटोग्राफर्सकडून गालावरची खळी घालविण्यासाठी टचिंग करण्याची पध्दती होती पण सध्या अँगल बदलून फोटो काढले तरी नकट्या माणसांचेही सरळ नाक असल्यासारखे फोटो येतात, अनेक नटनट्यांना पुढे आणण्यात फोटोग्राफर्सचा मोलाचा हिस्सा आहे, काहीजण फोटोजेनीक चेहर्‍यांचे असतात ते फोटोतच चांगले दिसतात, फोटोग्राफर्सच्या असोसिएशनने चांगला न्याय दिला आहे. सध्याची नोकरी करणारी ही ठोंब्याचा स्‍वयंपाक करुन नंतर कामावर जाते, रानात राबणारी स्त्री देखिली मोठ्या जबाबदारीने आपले संसार सांभाळते, आता हळूहळ जबाबदारी वितरीत करणे गरजेचे आहे, अमेरिकेसारख्या देशांचे अनुकरण करतांना त्यांच्या नवरा बायकोंच्या मिळून कामे करण्याच्या गुणांचेही अनुकरण होणे गरजेचे आहे, इथे सर्व कामे करतांना दिसून येत आहे, ज्या ठिकाणी सुशिक्षित असतील त्या देशाची प्रगती वेगाने झाल्याचे जगात दिसून येते.
          यावेळी गौरी गणपती आरास स्पर्धेतील विजेते विजया आप्पासाहेब इंगळे, शैलजा रेणके, सुशिला हिरेमठ, स्मिता शेळके, साधना वायकर, शिवशंकर कल्याण गौंडर, विजयश्री पाटील, सचिन गायकवाड, स्वप्नील बुरांडे, मंगल गव्हाणे यांना पारितोषिके देण्यात आली. परिक्षक म्हणून शरद काबरा, अशोक लोहार, प्रताप दराडे, अंकुश कंगले यांनी काम पाहिले. बार्शीतील फोटोग्राफीच्या क्षेत्रात चांगले काम करुन पुणे येथे स्थायिक होणार्‍या भाऊ समेळ यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्‍मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश वानखेडे यांनी तर सूत्रसंचलन आय्युब शेख व हातोडकर यांनी केले तर आभार कंगळे यांनी मानले.
 
Top