नळदुर्ग -: मोठया प्रमाणात होणा-या रासायनिक शेतीमुळे जमिनीचा पोत संपला असून जमिनीचे आरोग्‍य बिघडले आहे. पाणी धरुन ठेवण्‍याची जमिनीची क्षमता संपली आहे. शेतक-यांनी आता जागे होवून आपल्‍या जमिनी नापीक होण्‍यापासून वाचविण्‍यासाठी सेंद्रीय शेती केल्‍याशिवाय गत्‍यंतर नसल्‍याचे प्रतिपादन लातूर येथील सेंद्रीय शेतीतज्ञ संदीपान बडगीरे यांनी केले.
    अणदूर (ता. तुळजापूर) येथील सार्वजनिक गणेश मंडळाच्‍यावतीने आयोजित व्‍याख्‍यानमालेत ते बोलत होते. बडगीरे यांनी शेतक-यांना 'सेंद्रीय शेतीची फायदे' या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी ज्‍येष्‍ठ समाजवादी विचारवंत पन्‍नालाल सुराणा हे होते. पुढे बोलताना बडगीरे म्‍हणाले की, रासायनिक शेतीमुळे निघणारे अन्‍नधान्‍य खाण्‍यायोग्‍य नसून ते निकृष्‍ट आहे. सद्यस्थितीत 60-70 टक्‍के रोग असते. अन्‍नधान्‍य खाऊन होत आहे. सकस आहार नसल्‍यामुळे माणसाची रोगप्रतिकार शक्‍ती कमी झाली असून माणसाचे आयुष्‍यमान कमी झाले आहे. शेतक-यांनी आपल्‍या जनावरांसाठी, जमिनीसाठी शेती केली पाहिजे. कोणत्‍याही पक्षाला शेतक-यांविषयी देणेघेणे नाही. भारत हा फक्‍त म्‍हणण्‍यापुरताच कृषीप्रधान देश राहिला आहे. देशाचे अर्थमंत्री बजेट तयार करताना उदयोगपतींना विचारतात. परंतु शेतक-यांना विचारत नाहीत. ही आपली शोकांतिका आहे. शेतीमालाला सरकारने हमीभाव दिल्‍यास देशाची अर्थव्‍यवस्‍था कोलमडेल, असे सरकारला वाटते. म्‍हणून सरकार शेतीमालाला हमीभाव देत नाही. त्‍यामुळे शेतकरी हा कंगाल झाला आहे. पण तो देशाचा राजा आहे. त्‍यांचे शोषण थांबलेच पाहिजे. शेती फायदयात नसल्‍याने अल्‍पभूधारक शेतकरी आपली शेती विकत आहेत. देशात सत्‍तर टक्‍के शेतकरी अल्‍पभूधारक आहेत. भांडवलदार या शेती खरेदी करीत आहेत. शेतक-यांनी आपली शेती विकू नयेत, असे कळकळीचे आवाहनही त्‍यांनी यावेळी केले. याप्रसंगी पन्‍नालाल सुराणा यांचे अध्‍यक्षीय भाषण झाले.
    या कार्यक्रमास डॉ. शशिकात अहंकारी, दिपक आलुरे, बाबु शेख, दयानंद काळुंके, अरविंद घोडके, सोमनाथ बनसोडे, नाना गुरुजी यांच्‍यासह शेतकरी उपस्थित होते. प्रास्‍ताविक मंडळाचे अध्‍यक्ष पप्‍पू धमुरे यांनी केले तर सुत्रसंचालन व आभार प्रा. एम.बी. बिराजदार यांनी केले. सदरील कार्यक्रमात कृषीभूषण पुरस्‍कारप्राप्‍त शेतक-यांचा मंडळाच्‍यावतीने सत्‍कार करण्‍यात आला. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी राचप्‍पा जिडगे, अभिजीत वचनी, अमोल सालगे, अमित आलुरे, एस.के. टेलर, शिवानंद मुडके, जावेद तांबोळी, कुमार बचाटे, अजहर शेख, नागेश शेटे, दीपक साळुंके आदीजणांनी परिश्रम घेतले.
 
Top