बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : उन्‍मेश सृजनरंगाचा या सोलापूर विद्यापीठांतर्गत १० व्या युवा महोत्सवाच्या तयारीसाठी जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांची रंगीत तालीम सुरु झाली आहे. यंदाचा युवा महोत्सव हा लोकमंगल जैव तंत्रज्ञान महाविद्यालय, वळाळा येथे दि. २१ ते २४ सप्टेंबर दरम्यान होत आहे. आतापर्यंत झालेल्या ९ महोत्सवातील ६ वेळेस सर्वसामान्य विजेतेपदाचा बहुमान मिळविलेल्या शिवाजी महाविद्यालयाची नाट्य, संगीत, ललित, नृत्य आदी विभागाच्या सर्वच्या सर्व २८ स्पर्धाप्रकाराची जय्यत तयारी संत तुकाराम सभागृहात सुरु आहे. शिवाजी महाविद्यालयाने यापूर्वी सलग पाच वेळेस युवा महोत्सवाचे विजेतेपद मिळविले आहे. मागील तीन वर्षांपासून सुरु झालेल्या संपूर्ण संघातील उत्कृष्ठ कामगिरी करणार्‍या गोल्डन बॉय व गोल्डन गर्ल म्हणून स्वतंत्र पारितोषिके ठेवण्यात येतात. त्यातही बार्शीच्या शिवाजी महाविद्यालयाने १ वेळेस गोल्डन बॉय तर २ वेळेस गोल्डन गर्लचा बहुमान मिळविला आहे. यात स्वाती कांबळे, स्वाती जानराव व मुकूंद जाधव यांचा समावेश आहे. शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभागप्रमुख अबोली सुलाखे, कल्चरल कमिटी सदस्य प्रा.एस.एन.शिंदे, प्रा.रजनी जोशी, प्रा.सरवदे, प्रा.गव्हाणे, प्रा.गवळी हे शिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत तर माजी विद्यार्थी व अनुभवी तज्ञ म्हणून अमर देवकर, जयभिम शिंदे, साजीद बागवान, स्वाती जानराव हे विद्यार्थ्यांकडून योग्य पध्दतीचा सराव करुन घेत आहेत.
    २४ विद्यार्थी व १६ विद्यार्थीनी असे ४० विद्यार्थी युवा महोत्सवाची तयारी करत असून समुहगीत, शास्त्रीय गायन, सुगम संगीत, पेंटींग, मातीकाम, रांगोळी, मराठी-हिंदी-इंग्रजी स्पीच, वाद़-विवाद, कथाकथन, कविता यांची तयारी सुरु असतांना त्यांचे व्हिडीओ चित्रीकरण करुन त्याची चित्रफित त्या विद्यार्थ्यांना दाखवून होणार्‍या चुका कोणत्या व त्या त्रुटी दूर करण्यासाठी काय करणे गरजेचे याचे अचूक मार्गदर्शन नियमित सरावात होत आहे. सकाळी ८ ते रात्री ११ पर्यंत हा दैनंदिन उपक्रम सुरु असून सरावासाठी लागणारे सर्व साहित्य महाविद्यालयाने उपलब्ध करुन दिले आहे. याच महाविद्यालयाप्रमाणे चांगली जय्यत तयारी करुन येणारे पारंपारिक प्रतिस्पर्धी महाविद्यालये म्हणून स्टेज शो करिता अकलूजचे महाविद्यालय, सोलापूरचे वालचंद व संगमेश्वर, बार्शीचे शिवाजी, डान्सकरिता सिंहगड कमलापूर, एल.बी.पी. सोलापूर, विज्ञान महाविद्यालय सांगोला, वालचंद, सोलापूर, झाडबुके महाविद्यालय बार्शी, शिवाजी नाईट कॉलेज सोलापूर, शिवाजी महाविद्यालय बार्शी यांच्याकडे पाहिले जाते.
    यावेळी बोलतांना विभाग प्रमुख अबोली सुलाखे यांनी म्हटले आम्ही सर्वजण युवा महोत्सवातील यश संपादन करण्यासाठी प्रशत्नशील आहोत. संपूर्ण टिमच्या माध्‍यमातून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येते, यश संपादन करण्याच्या परंपरेप्रमाणे याही वर्षी आपल्या महाविद्यालयाला बहुमान मिळेल, चांगले कलाकार पुढे येण्यासाठी सर्व शक्तीनिशी सहभाग घेत आहोत.
 
Top