कळंब (बालाजी जाधव) -: जेवणाचे बिल देण्‍याच्‍या कारणावरुन दोन गटात कोयता, लाकडे व शित पेयाच्‍या बाटलीने झालेल्‍या तुंबळ हाणामारीमध्‍ये तिघेजण जखमी झाले असून त्‍यापैकी एकजण गंभीर जखमी आहे. ही घटना कळंब शहरातील शिवाजी चौकामध्‍ये असलेल्‍या एका हॉटेलमध्‍ये मंगळवार दि. 15 ऑक्‍टोबर रोजी रात्री पावणे अकरा वाजण्‍याच्‍या सुमारास घडली. गंभीर जखमी असणा-या एकास अंबेजोगाई येथील रुग्‍णालयात उपचारासाठी दाखल करण्‍यात आले आहे. दरम्‍यान दोन्‍ही गटांनी परस्‍पराविरोधी कळंब पोलीस ठाण्‍यात तक्रारी दिल्‍यावरुन बारा जणांविरूद्ध गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. अकरा आरोपींना अटक करुन न्‍यायालयात उभे केले असता न्‍यायाधिशांनी आरोपींना दि. 21 ऑक्‍टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश दिले आहे.
    कळंब शहरातील शिवाजी चौक भागातील हॉटेल विशाल लंच होम येथे दि. 15 ऑक्‍टोबर रोजी रात्री पावणे अकरा वाजण्‍याच्‍या सुमारास सचिन सौलाखे,  रोहन राजमाने, संदीप पांचाळ, कुणाल वाघमारे, बाळु मुळे, गणेश रणखांब (सर्व रा. कळंब) हे जेवण करण्‍यासाठी आले होते. जेवणानंतर हॉटेलमालक शंकर इंगळे (रा. कळंब) यांनी बील मागितले असता वरील मंडळींनी वाद घालण्‍यास सुरुवात केली. यातील एकाने दिपक सौलाखे, विनोद सौलाखे, सत्‍यवान सौलाखे यांना फोन करुन बोलावले. या सर्वांनी मिळून हॉटेलमालकाचा मुलगा विशाल याच्‍या डोक्‍यात थंड पेयाची बाटली मारुन गंभीर जखमी केले. तसेच दुसरा मुलगा कार्तिक व हॉटेलमधील महिलांनी मारहाण करुन जीवे कारण्‍याची धमकी दिल्‍याची फिर्याद शंकर इंगळे यांनी दिल्‍यावरुन वरील नऊ जणांविरूद्ध कळंब पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.
    तसेच सचिन सौलाखे यांनी कळंब पोलीसांत दिलेल्‍या तक्रार दिली आहे. सचिन सौलखे, रोहन राजमाने, संदीप पांचाळ, कुणाल वाघमारे, बाबु मुळे, गणेश रणखांब हे दि. 15 ऑक्‍टोबर रोजी रात्री पावणे अकरा वाजण्‍याच्‍या सुमारास विशाल मंच होम येथे जेवणासाठी गेले होते. जेवणाचे बिल दिल्‍यानंतर विशाल इंगळे यांनी काहीही संबंध नसताना राहुल घोगरे याचे बिल राहिले आहे ते द्या, असा तगादा लावला. त्‍या बिलाचा आमचा काही संबंध नाही, असे सांगितल्‍यानंतरही विशाल इंगळे, शंकर इंगळे, कार्तिक इंगळे यांनी काचेच्‍या बाटल्‍या, लाकडे तसेच शंकर इंगळे यांनी कोयत्‍याने मारुन सचिन सौलाखे व सत्‍यवान सौलाखे यास जखमी केल्‍याची तक्रार सचिन सौलाखे यांनी कळंब पोलीसात दिल्‍यावरुन वरील तिघांविरूद्ध गुन्‍हा करण्‍यात आला आहे.
 
Top