बार्शी खुनाच्या गुन्ह्यात जन्‍मठेपेची  शिक्षा मिळाल्यानंतर त्या कैद्यास अल्पशी सुट्टी देण्यात आली. येरवडा कारागृहात पुन्हा शिक्षेसाठी हजर होण्याऐवजी तो फरार झाल्याने त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याऐवजी त्याच्याकडे डोळेझाक झाल्‍याचे उघडकीस आले आहे
. सदरच्या प्रकारावर प्रकाशझोत पडल्यावर झोपी गेलेले व्यवस्थापन खडबडून जागे झाले आणि सदरच्या पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याचे काम सुरु झाले. बार्शी पोलिसांत अशाच प्रकारचा एक गुन्हा दाखल झाला असून येरवडा जेलमधील कारभाराबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.
         यातील शिक्षा मिळालेल्या कैद्याचे नाव भरत दत्तात्रय नवगण असे असून भवानी पेठ येथील निवासस्थानी दि.९ ऑगस्ट १९८६ रोजी सुट्टीवर आल्यानंतर पुन्हा उर्वरित शिक्षा भोगण्यासाठी तो हजरच झाला नाही. सदरच्या आरोपीबाबत पुन्हा त्वरीत कायदेशीर कारवाई करण्याऐवजी त्याच्याकडे पुर्णपणे दुर्लक्षच झाले. अशा प्रकारचे आणखी बरेच गुन्हेगार असल्याची माहिती समोर येत आहे. सदरच्या प्रकारावरुन अत्यंत महत्वाच्या प्रश्‍नावर शासनाने नेमलेले कायदा सुव्यवस्थेतील कर्मचारी किती काटेकोर काम करतात त्याचा प्रत्यय येतो. त्याहूनही कहर म्हणजे सदरच्या गुन्हेगाराचे छायाचित्र प्रसिध्द केल्यास त्याचा शोध घेणे सोपे होते परंतु त्याचे छायाचित्रदेखिल उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येते. यावरुन सदरच्या कैद्याला जन्मठेप झाली की नाही याबाबत शंका निर्माण होत आणि केवळ कागदोपत्रीच जन्‍मठेप मिळाली की आणखी जाणीवपूर्वक त्रुटी निर्माण करुन सदरच्या कैद्याला मोकळीक दिली याचा खुलासा करणे गरजेचे आहे. बार्शी पोलिसांत सदरच्या घटनेची फिर्याद येरवडा येथील तुरुंग रक्षक कारागृह राहुल मारुती भोसले यांनी दाखल केली असून पुढील तपास पो.हे.कॉं.भोसले हे करित आहेत.
 
Top