'सावरखेड एक गाव', 'ब्‍लाइंड गेम', 'सनई चौघडे' सारखे वेगळवेगळ्या विषयांवरचे चित्रपट असो वा कादंबरीवर आधारित 'पांगिरा', 'जोगवा', '72 मैल एक प्रवास' सारखे सामाजिक विषयांवर स्‍पर्श करणारे चित्रपट दिग्‍दर्शक राजीव पाटील यांनी आपल्‍या प्रत्‍येक कलाकृतींतून आशय मांडण्‍याचा नेहमीच प्रयत्‍न केला. त्‍यांच्‍या अकस्‍मात निधनाने संपूर्ण मराठी चित्रपटसृष्‍टीवर शोककळा पसरली आहे. 
राजीव पाटील आपल्‍या आगामी 'वंशवेल' या चित्रपटासाठी खूप उत्‍सुक होते. हा चित्रपट घरोघरी पोहोचावा, अशी त्‍यांची इच्‍छा होती. परंतु त्‍यांच्‍या या अकाली निधनाने वंशवेल चित्रपटाच्‍या प्रदर्शनाबाबतीत त्‍यांच्‍या चाहत्‍यांच्‍या मनात संभ्रम निर्माण झाला होता. परंतु राजीव पाटील यांचे स्‍वप्‍न असलेला 'वंशवेल' हा चित्रपट ठरविलेल्‍या तारखेदिवशीच म्‍हणजे 18 ऑक्‍टोबरला प्रदर्शित करण्‍यात येत असल्‍याचे चित्रपटाचे निर्माते सुनील मानकर यांनी सांगितले.
 
या संदर्भात सुनिल मानकर यांनी राजीव पाटील यांच्‍या कुटुंबियांशी चर्चा केली असता, त्‍या सगळ्यांनीच 'वंशवेल' हा केवळ चित्रपटच नाही, तर ते राजीव यांचे स्‍वप्‍न होते, अशी प्रतिक्रिया दिली. राजीव पाटील जरी आपल्‍यात नसले तरी त्‍यांनी पाहिलेले स्‍वप्‍न पुर्णत्‍वाकडे नेणे हे आपले कर्तव्‍य आहे, अशी त्‍यामागची भावना होती. चित्रपटातील सर्व कलाकार या दुःखातून सावरुन राजीव पाटील यांच्‍या स्‍वप्‍नपूर्तीसाठी पूर्वीच्‍याच जोमाने प्रयत्‍न करणार असयाची माहिती निर्माते सुनील मानकर यांनी दिली. हा चित्रपट ठरल्‍या तारखेला प्रदर्शित करण्‍यासोबतच तो यशस्‍वी करणे हीच ख-या अर्थाने राजीव पाटील यांना श्रध्‍दांजली ठरेल, अशी भावना ही यातील कलाकारांनी आणि चित्रपटाच्‍या टीमने व्‍यक्‍त केली.
 'अर्चित फिल्‍मस्' बॅनरच्‍या 'वंशवेल' या चित्रपटात अंकुश चौधरी, किशोर कदम, सुशांत शेलार, शंतनू गंगणे, मनिषा केळकर, नम्रता गायकवाड, विद्या करंजीकर, उषा नाईक या कलाकारांच्‍या दमदार भूमिका आहेत. दामोदर मानकर यांची कथा असलेल्‍या 'वंशवेल' या चित्रपटाचा कथाविस्‍तार आणि प‍टकथा ही राजीव पाटील आणि दत्‍ता पाटील यांची आहे. 'वंशवेल' हा चित्रपट स्‍त्री-पुरुष समानता हा विचार केवळ आदर्शापुरता मर्यादित न ठेवता यांची अंमलबजावणी माणुसपणाच्‍या विचारातून करायला हवी, हा उद्देश देणारा आणि एकत्रित कुटुंब पध्‍दतीवर सकारात्‍मकपणे भाष्‍य करणारा आहे.
    'वंशवेल' या चित्रपटात एकूण चार गाणी असून ती अमितराज या नव्‍या दमाच्‍या संगीतकाराने संगीतबध्‍द केली आहेत. यात 'कुणाच्‍या नावाने रंगला गं, रंग बाई मेंदीचा...' हे लग्‍न समारंभातील अवखळ गीत कीर्ती किल्‍लेदार आणि प्रांजल देशपांडे यांनी गायले आहे. संवेदशनील कवी व गीतकारी सौमित्र यांनी हे गीत लिहिले असून त्‍यांच्‍या लेखणीतून उतरलेलं 'ती जखम जुनी' हे ह्दयस्‍पर्शी गीत कुणाल गांजावाला यांनी गायलेलं आहे. कुटुंबातील आनंदी वातावरण जपणारं 'तुझ्या-माझ्या, माझ्या-तुझ्या सहवासाचा संसार हा...' हे दत्‍ता पाटील लिखित गीत कीर्ती किल्‍लेदार यांनी स्‍वरबध्‍द केले आहे. स्‍त्रीशक्‍तीचे महत्‍त्‍व सांगणा-या या चित्रपटात 'अंबे कृपा करी' या एक आगळ्या-वेगळ्या गाण्‍याचाही समावेश आहे. नवरात्रीच्‍या उत्‍सवाचा मूड जपणा-या या गीतांमध्‍ये मराठीतील आघाडीच्‍या 18 अभिनेत्रींनी नृत्‍याचा फेर धरला आहे हे विशेष. आदर्श शिंदे यांनी गायलेल्‍या या गीताचे शब्‍द दत्‍ता पाटील यांचे आहेत. सध्‍या हे प्रमोशनल सॉंग सर्वत्र गाजतंय. 'व्हिडीओ पॅलेस' कंपनीने हे ध्‍वनीफित बाजारात आणली असून प्रेक्षकांना ती नक्‍कीच आवडेल अशी आहे.

* गिरीश लोहारेकर 
तुळजापूर
 
Top