सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात रब्बी हंगाम सन 2013-14 साठी हवामानावर आधारीत पिक विमा योजना पथदर्शक स्वरुपात राबविण्यायत येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने तापमानातील बदल, आर्द्रता,अवेळी पाऊस या विविध हवामान घटकापासून होणा-या नुकसानीस विमा संरक्षण देण्यात येणार आहे. विमा हप्ता भरणेची अंतिम मुदत गहू दि. 15.10.2013, ज्वारी दि. 31.10.2013 अखेर आहे. तरी अंतिम मुदतीच्या अगोदर कृषि विमा योजनेमध्ये भाग घ्यावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सोलापूर आर. एस. नाईकवाडी यांनी केले आहे. सोलापूर जिल्ह्यात ज्वारी व गहू या पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे. या पिकासाठी प्रत्येकी रु. 25000/- प्रतिहेक्टरी या मार्याद्रपर्यंत विमा संरक्षण देण्यात येणार आहे. तसेच राष्ट्रीय कृषि विमा योजना रब्बी 2013-14 मध्ये गहू जिरायत, ज्वारी बागायत व जिरायत या पिकासाठी 80 टक्के या उच्चा जोखीमस्तरावर राबविण्यात येणार असल्यामुळे पिकांच्या उबरठा उत्पन्नात वाढ होऊन शेतक-यांना वाढील विमा संरक्षण उपलब्ध होणार आहे. या योजनेत सहभागी होणारे शेतकरी 1.5 ते 2 टक्के या मार्यादित दराने विमा हत्पा भरणार असून अल्प व अत्यल्प भूधारक शेतक-यांसाठी विमा हप्त्यात केंद्र शासनाकडून 5 टक्के अनुदान देय असून सर्व शेतक-यांसाठी राज्य शासनामार्फत वाढीव विमा हप्ता अनुदान देण्यात येणार आहे. तसेच राष्ट्रीय कृषि विमा योजने अंतर्गत राज्यातील सर्व अधिसूचित पिकांसाठी अधिसूचित क्षेत्रासाठी गारपीट, पूर, चक्रीवादळ, भूस्खलन या स्थानिक आपत्तीमुळे होणा-या नुकसानीचे वैयक्तिकस्तरावर पंचानामे करुन भारतीय कृषि विमा कंपनीमार्फत नुकसान भरपाई निश्चित करण्यात येणार आहे. विविध वित्तीय संस्थाकडे पीक कर्जासाठी अर्ज केलेल्या व ज्यांनी अधिसूचित पिकांसाठी पिक कर्ज मर्यादा मंजूर आहे अशा सर्व शेतक-यांना सदर योजना अधिसूचित पिकास बंधनकारक आहे. बिगर कर्जदार शेतक-यांना ही योजन ऐच्छिक राहील. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार निवडण्यात आलेल्या जिल्ह्यात हवामानावर आधारित पिक विमा योजनेबरोबर राष्ट्रीय कृषि विमा योजना सुरु राहणार असून कर्जदार शेतक-यांना हवामान आधारित पिक विमा योजना बंधनकारक राहणार आहे. यादृष्टीने या योजनेमध्ये शेतक-यांनी सहभाग घ्यावा व हंगामामध्ये विविध समस्यामुळे / आपत्तीमुळे होणारे पिक नुकसान टाळण्यासाठी पिक विमा भरुन योजनेचा फायदा घ्यावा. अधिक माहितीसाठी उपविभागीय कृषि अधिकारी, सोलापूर, पंढरपूर, कुर्डुवाडी व तालुका कृषि अधिकारी कार्यालय तसेच गाव पातळीवरील मंडळ कृषि अधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क साधावा.