मुंबई :-  पांगरी (ता. बार्शी, जि. सोलापूर) या गावाला पाथरी लघुपाटबंधारे प्रकल्पावरुन पाणीपुरवठा करण्याच्या प्रस्तावास बुधवार रोजी राज्य मत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. आता पाथरी तलाव ते पांगरी गाव या पाणीपुरवठा योजनेची आखणी करुन या प्रस्तावाला पाणीपुरवठा विभागामार्फत तातडीने मंजुरी दिली जाईल, अशी माहिती राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप सोपल यांनी दिली.
   जलसंपदा विभागाच्या प्रकल्पातून राज्यातील घरगुती पिण्याच्या पाण्याच्या विविध 5 प्रस्तावांना आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यात पुरक पांगरी नळ पाणीपुरवठा योजनेचा (ता. बार्शी, जि. सोलापूर) समावेश आहे.  पांगरी गावासाठी पाथरी लघुपाटबंधारे प्रकल्पावरील 0.22 दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षणास मंजुरी मिळाली आहे. वैराग (ता. बार्शी, जि. सोलापूर) या गावासाठी 4.50 कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना ऊभी करण्यास नुकतीच मान्यता देण्यात आली आहे. आता त्याच धर्तीवर बार्शी तालुक्यातील लोकसंख्येच्या दृष्टीने वैराग खालोखाल मोठ्या असलेल्या पांगरी गावातही पाणीपुरवठा योजना निर्माण केली जाईल. पाथरी तलावावरुन पांगरी गावापर्यंत साधारण 10 किमी लांबीची जलवाहिनी (पाईपलाईन) निर्माण करणे, पाणीसाठवण टाक्या, फिल्टरेसन टँक उभारणे आदी कामे पाणीपुरवठा विभागामार्फत केली जातील. या कामांसह संबंधीत पाणीपुरवठा योजनेस आपली तत्वत: मंजुरी असल्याचे श्री. सोपल यांनी सांगितले. आता या पाणीपुरवठा योजनेची तांत्रिक, प्रशासकीय तसेच आर्थिक मंजुरीच्या दृष्टीने आखणी करुन या प्रस्तावाला पाणीपुरवठा विभागामार्फत तातडीने मंजुरी दिली जाईल, असे त्यांनी सांगितले. 
 
Top