उस्मानाबाद : हातोला (ता. वाशी, जि. उस्‍मानाबाद) साठवण तलावाचे निकृष्ट काम करणा-या अधिका-यांवर कार्यवाही न करता संबंधित अधिका-यांना पाठिशी घालत असल्याचा आरोप करत वाशी तालुक्यातील मनसे कार्यकर्त्‍यांनी बुधवार दि. ९ ऑक्टोंबर रोजी जिल्‍हाधिका-यांच्‍या शासकीय वाहनाची मोडतोड केली. तसेच जिल्हाधिकारी व पाटबंधारे विभागाच्या कार्यालयावर दगडफेक करून हे कार्यालय फोडले. यावेळी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेत जिल्‍हाधिकारी यांचा सुरक्षारक्षक जखमी झाला आहे. 
 
वाशी तालुक्‍यातील हातोला साठवण तलावाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे या तलावाला गळती लागली होती. या गळतीने संबंधित तलाव फुटण्याचा धोका होता. यासंदर्भात वाशी येथील मनसे कार्यकर्त्‍यांनीनी व ग्रामस्थांनी आमरण उपोषण केले होते. यावेळी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी उपोषणकत्र्यांना हातोला साठवण तलावाच्या सांडव्याच्या कामाची चौकशी करून दोषी कर्मचा-यांवर कार्यवाही केली जाईल असे आश्वासन देण्यात आले होते. त्यामुळे वाशीचे मनसे तालुकाध्यक्ष सचिन इंगोले व ग्रामस्थांनी उपोषण मागे घेतले.
      उपजिल्हाधिकारी राऊत व पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता कोटेचा यांनी ग्रामस्थांना दिलेले आश्वासनाची मुदत संपूनही या प्रकरणाची कसलीही चौकशी केली नसल्याचा आरोप करत आज वाशीचे मनसे तालुकाध्यक्ष सचिन इंगोले यांच्या नेतृत्वाखाली मनसे कार्यकर्त्‍यांनी अचानक दुपारच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन केले. यावेळी सचिन इंगोले यांच्यासह एका कार्यकत्र्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उभी असलेली जिल्हाधिकारी डॉ. के. एम. नागरगोजे यांची गाडी (क्र. एम. एच. २५/१) याच्यावर दगड मारून या गाडीच्या काचा फोडल्या. त्यानंतर जोरदार घोषणाबाजी करीत हे कार्यकर्ते जिल्हाधिका-यांच्या दालनात घुसण्याचा प्रयत्न करीत होते. यावेळी जिल्हाधिका-यांच्या अंगरक्षकाने त्यांना अडविले असता या कार्यकत्र्यांनी जिल्हाधिकारी यांच्या कॅबिन बाहेरील काचा फोडल्या.
     अंगरक्षकाने रोखल्यामुळे हे कार्यकर्ते जिल्हाधिका-यांच्या दालनात घुसू शकले नाहीत. लागलीच पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेतले. याचवेळी कांही मनसे कार्यकर्ते आनंद नगर येथील पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता कोकाटे यांच्या कार्यालयात गेले व तेथील कॉम्प्युटर रुमवर दगडफेक करून त्याची तोडफोड केली. घोषणाबाजी करीत या कार्यकत्र्यांनी कार्यालयाची तोडफोड केली.हा प्रकार समजताच पोलिसांनी घटनास्थळी जावून या आंदोलकांना ताब्यात घेतले असून यामध्ये वाशीचे मनसे तालुकाध्यक्ष सचिन इंगोले यांच्यासह वाशी मनसेचे उपप्रमुख भराटे व आणखी दोन कार्यकत्र्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
     मनसे कार्यकर्त्‍यांनी तोडफोड आंदोलन करताना एकाच वेळी जिल्हाधिकारी कार्यालय व पाटबंधारे विभागाच्या कार्यालयावर दगडफेक केली. यामध्ये सचिन इंगोले व सुरेश भराटे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय तर यावेळी राजेंद्र गपाट व रमेश सुकाळे या दोघांनी पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता कोकाटे यांच्या कार्यालयावर दगडफेक केली. पोलिसांनी इंगोले व भराटे यांना लगेच ताब्यात घेतले तर गपाट व सुकाळे यांना जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून ताब्यात घेतले.
     या प्रकरणातील दोषी अधिका-यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून कार्यवाहीचे चावडी वाचन करण्याचे आश्वासन संबंधित अधिका-यांनी दिले होते. मात्र प्रशासनाकडून दोषी अधिका-यांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न केला जात असल्याने मनसेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालय फोडण्यात आले आहे. तरीही दोषींवर कार्यवाही न केल्यास पुढच्या आंदोलनात तोंडाला काळे फासण्याचा इशारा मनसेचे राजेंद्र गपाट यांनी दिला आहे.
      जिल्हाधिकारी कार्यालय व पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी तसेच शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी मनसेचे वाशी तालुकाध्यक्ष सचिन मच्छिंद्र इंगोले, सुरेश सखाराम भराटे, राजेंद्र बाबासाहेब गपाट, रमेश मारुती सुकाळे या चौघांविरोधात उस्मानाबाद शहर पोलिस ठाण्यात भादवि कलम ३२३, ३५३, ३४ तसेच ३७ (१) (३३) (१) एईटीसह सार्वजनिक मालमत्ता विद्रुपन कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या चौघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. वैशाली कडूकर या करीत आहेत.
 
Top