पांगरी (गणेश गोडसे) : वाढत्या आधुनिकतेबरोबरच शिक्षणाचे बाजारीकरणही वाढत असुन मोफत शिक्षणापेक्षा विकत मिळणा-या शिक्षणाकडे पालकांचा कल वाढत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येण्‍यासाठी कै.दि.वा.नारकर यांनी केलेले कार्य खरोखरच कौतुकास्पद असुन त्यांच्या विचारांचा वारसा विद्यार्थांनी पुढे नेण्यासाठी मनापासुन प्रयत्‍न करावेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व महाराष्ट्र नवर्निमाण सेनेचे सरचिटणीस अनिल शिदोरे यांनी केले.
    पांगरी (ता. बार्शी) येथे कै.दि.वा.नारकर यांच्या चौदाव्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात 'समाजाचे देणे' या विषयावर प्रमुख वक्ते म्हणुन अनिल शिदोरे हे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष बापुसाहेब नारकर होते. यावेळी व्यासपीठावर बार्शी पंचायत समितीच्या सभापती सौ. कौशल्या माळी, माजी जि.प.सदस्य कौडाप्पा कोरे, संस्थेचे सचिव शशिकांत नारकर, न्यु इंग्लिश स्कुल अंबेजवळगेचे मुख्याध्यापक बालाजी कोकाटे, प्राचार्य अशोक मुंढे, महादेव माळी, सुलाखे हायस्कुलचे माजी मुख्याध्यापक गौरकर, तृप्ती नारकर, मोहन घावटे, प्रतिक नारकर आदीजण उपस्थित होते.
  शिदोरे पुढे बोलताना म्हणाले की, पुर्वी शिक्षणाकडे ज्ञानयज्ञ म्हणुन पाहिले जात असे. जेव्हा आपण समाजासाठी काहीतरी करत असतो तेव्हा ती गोष्‍ट आपल्यासाठीच करत असतो असे आहे. किरकोळ गोष्‍टीमधुनच माणुस पुढे घडत असतो, असे सांगुन पुण्यातील सध्याच्या उद्योगपतीमधील निम्मे उदयोगपती हे शाळास्तरावर साबण विक्री स्पर्धेतील सहभागी विदयार्थी आहेत.
  संस्थाध्यक्ष बापु नारकर यांनी यावेळी प्रास्ताविकात म्‍हणाले, कै. काकांच्या विचाराचा वारसा पुढे चालवण्‍यासाठी आम्ही विद्यार्थी हाच केंद्रबिंदु मानून चालत असुन त्यांच्यावर शालेयस्तरावर संस्कार करून सहका-यासह समाजाचा महत्वाचा घटक तयार करण्‍याचा प्रयत्न करतो.
    तृप्ती नारकर यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. अतुल देशपांडे यांनी आजपर्यंत प्रशालेने राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. या कार्यक्रमातच सेवानिवृत्त झालेल्या जरिना बादशहा यांच्यासह इतर शिक्षकांचा सत्कार करण्‍यात आला. सुत्रसंचालन सोमेश्‍वर घानेगांवकर यांनी केले.
 
Top