राजकोट :- युवराज सिंगच्या नाबाद ७७ धावांच्या खेळीमुळे भारताने एकमेव टी-२०सामन्यात ऑस्ट्रेलियावर सहा गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजीकरत ऑस्ट्रेलियाने सात बाद २०१ धावा केल्या होत्या. भारताने सहा गडी आणि दोन चेंडू राखून विजय मिळवला.
    सौराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या खंडेरी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रोलियाकडून आरोन फिंचने ५२ चेंडूत ८९ धावांची खेळी करत ऑस्ट्रोलियाला २० षटकात २०१ धावांपर्यंत पोहचवले. भारताकडून भुवनेश्वर कुमार आणि विनय कुमार यांनी प्रत्येकी दोन तर आर.जडेजाने एक गडी बाद केले.
      विजयासाठी २०२ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारताच्या डावाची सुरुवात खराब झाली. रोहित शर्मा केवळ आठ धावा काढून बाद झाला. त्यानंतर सुरेश रैना १९ धावांवर बाद झाला.  शिखर धवन ३२ धावांवर बाद झाला.   तर विराट कोहली २९ धावांवर बाद झाला. आघाडीचे चार फलंदाज बाद झाले होते तेव्हा भारताची अवस्था अकरा षटकात चार बाद १०० अशी होती.
        त्यानंतर युवराच सिंगने पाच षटकार आणि आठ चौकारांच्या मदतीने धावांचा पाऊस पाडला. त्याने कर्णधार महेंद्रसिंग ढोणीसोबत पाचव्या विकेटसाठी १०२ धावांची भागीदारी केली.
 
Top