उस्मानाबाद :  महात्मा गांधी नरेगा जागृती अभियानांतंर्गत ग्राम विकासाची कामे मार्गी लागावीत. समृध्द आणि स्वावलंबी खेडी तयार करण्यासाठी आणि या अभियानाची  लोकचळवळ व्हावी यादृष्टीने लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी  काम करावे, अशी अपेक्षा पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी व्यक्त केली.
    गरजू शेतकरी, भूमिहीन शेतमजूर यांना शेतीची कामे सुरु नसताना रोजगाराची हमी मिळावी यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेची गाव, तालुका आणि जिल्हास्तरावरील यंत्रणांच्या माध्यमातून प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आजपासून महात्मा गांधी नरेगा जागृती अभियानाची सुरुवात पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते झाली. येत्या ३१ आक्टोबरपर्यंत हे अभियान चालणार आहे. येथील जिल्हाधिकारी कार्यालय  सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. के.एम.नागरगोजे, मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एल.हरिदास, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. हजारे, अपर जिल्हाधिकारी जे.टी. पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपजिल्हाधिकारी (रोहयो) संतोष राऊत, उपजिल्हाधिकारी सर्वश्री शिल्पा करमरकर, राम मिराशे, बी.एस.चाकूरकर, जिल्हा नियोजन अधिकारी एम. के. भांगे,  तहसीलदार सुभाष काकडे यांच्यासह जिल्हा परिषदेच्या विविध विभागप्रमुखांची यावेळी उपस्थिती होती. पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते यावेळी महात्मा गांधी नरेगा योजनेची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
    कार्यक्रमाच्या सुरुवातीला पालकमंत्री चव्हाण व उपस्थितांच्या हस्ते महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान कै.लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
     पालकमंत्री चव्हाण म्हणाले की, ग्रामसमृध्दीसाठी हे अभियान महत्वाचे आहे. विकासासाठी सर्वांची एकत्रित भूमिका असणे आवश्यक आहे. नरेगाच्या माध्यमातून जलसंधारणाची अधिकाधिक कामे हाती घेतली जावीत. कामे करतांना ती दर्जात्मक तसेच गुणवत्तापूर्ण असावीत. शासन निधीची कमतरता भासू देत नाही. या योजनेंतर्गत कृषी, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय, ग्रामीण स्वच्छता आदींची विविध कामे हाती घेता येणार आहेत. वर्षभर रोजगाराची हमी, पायाभूत सुविधांचा विकास आणि ग्रामपंचायतींचे सक्षमीकरण करणारे हे अभियान चांगल्या प्रकारे राबवावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
    जिल्हाधिकारी डॉ.नागरगोजे यांनी आजपासून सुरु होणाऱ्या जागृती अभियानाची माहिती दिली. प्रत्यक्ष काम सुरु करणे, जलसाक्षरता अभियान राबविणे, तक्रार निवारण,  सामाजिक अंकेक्षण, अपूर्ण कामे पूर्ण करणे, मजूरी वाटप, विविध योजनांची महात्मा गांधी नरेगा सोबत सांगड घालणे , रोपवन व संरक्षण आदी कामे या अभियान कालावधीत करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 
Top