प्रमोद महाजन
उस्मानाबाद : येथील तपस्वी चॅरीटेबल ट्रस्ट, येवती संचलित व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने भाजपाचे दिवंगत नेते कै. प्रमोदजी महाजन यांच्या स्मृती प्रित्यर्थ प्रमोद महाजन स्मृती आंतरमहाविद्यालयीन राष्ट्रीय वाद-विवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महाजन महाविद्यालयाच्या प्रांगणात येत्या २९ व ३० ऑगस्ट रोजी या स्पर्धा घेण्यात येणार आहेत.
    व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने घेण्यात येणा-या प्रमोदजी महाजन स्मृती आंतरमहाविद्यालयीन वाद-विवाद स्पर्धेचे हे सातवे वर्षे असून मंगळवार दि. २९ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वा. या स्पर्धेचे उद्घाटन तर बुधवार दि. ३० ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३० वा. लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांच्या हस्ते या स्पर्धेतील विजेत्या संघास पारितोषिकांचे वितरण करण्यात येणार आहे.
    सदरची स्पर्धा मराठी, हिंदी व इंग्रजी अशा तीन भाषेत घेतली जाणार असून यावर्षी या स्पर्धेसाठी पाकिस्तान आणि चीनचा दहशतवाद रोखण्यास भारत समर्थ आहे/नाही, सोशल नेटवर्कींग सुविधेचे विकृतीत रुपांतर होत आहे/नाही व तरुणाचा देश म्हणून लाभ घेण्यास भारत सक्षम आहे/नाही असे तीन विषय या स्पर्धेसाठी ठेवण्यात आले आहेत. या स्पर्धेतील प्रथम विजेत्या संघास १५००१ रु. रोख, करंडक व प्रमाणपत्र, द्वितीय संघास ७००१ करंडक व प्रमाणपत्र व तृतीय संघास ५००१ करंडक व प्रमाणपत्र देण्यात येणार असून तिन्ही भाषेतील स्पर्धकांसाठी उत्तेजनार्थ १००१ रु. चे बक्षिसही देण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट सादरीकरणासाठी संस्थेच्या वतीने वैयक्तीक प्रमाणपत्र व पुस्तकांचा संच भेट देण्यात येणार आहे.
    सदरची स्पर्धा ही देशातील युजीसी संलग्न विद्यापीठातील महाविद्यालयीन विद्याथ्र्यांसाठी खुली राहणार असून सहभागी संघास कोणत्याही एका विषयाकरता सहभाग नोंदवता येणार आहे. प्रत्येक स्पर्धकास सात मिनीटे वेळ दिला जाणार असून स्पर्धेत सहभागी होवू इच्छिणा-या संघासाठी दोनशे रु. शुल्क ठेवण्यात आले आहे. तसेच सहभागी स्पर्धकांनी आवश्यक कागदपत्रे तसेच ओळखपत्र सादर करणे बंधनकारक राहणार आहेत.
    तरी महाविद्यालयांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन तपस्वी चॅरीटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा पुनम महाजन-राव, सचिव अ‍ॅड.मिलिंद पाटील व महाजन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.अनार साळूंके यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी स्पर्धा प्रमुख प्रा.अशोक गोरे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.
 
Top