ताज्या घडामोडी

सोलापूर  : पंढरपूर आषाढी वारीसाठी दरवर्षी अंदाजे 10 ते 12 लाख भाविक पंढरपूरात येतात. त्यांना चांगल्या सोयी, सुविधा मिळाव्यात. या कालावधीत कोणत्याही प्रकारची आपत्ती उद्भवू नये यासाठी सर्व विभागांनी सखोल व सुक्ष्म आराखडा तयार करावा असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. प्रविण गेडाम यांनी दिले.
      येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पंढरपूर आषाढी वारी आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यासाठी आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम कासार, अप्पर पोलीस अधीक्षक तुषार दोषी, निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख आदींची  प्रमुख उपस्थिती होती.
    यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी डॉ. गेडाम म्हणाले की, यासाठी आदर्श परिस्थिती व प्रात्यक्षिक परिस्थिती लक्षात घेवून नियोजन करावे. तसेच आदर्श परिस्थितीचा विचार करुन कशा प्रकारचे किती मनुष्यबळ लागणार आहे, याची मागणी वेळेत शासनाकडे करता येईल. तसेच उपलब्ध मनुष्यबळातून कशा प्रकारे कामे करण्यात येणार आहेत. याचाही आराखडा सर्व शासकीय विभागाच्या जिल्हा प्रमुखांनी करावा. प्रत्येक विभागाचा कोणता अधिकारी/कर्मचारी केव्हा कोठे उपलब्ध असेल, तो काय काम करेल याबाबतची कायमस्वरुपी कामाची जबाबदारी निश्चित केल्यास अधिक सतर्कता राहून चांगले काम होवू शकेल असे प्रतिपादन डॉ. गेडाम यांनी केले.
   जिल्ह्यात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीची व तुकाराम महाराजांची पालखी आल्यापासून, परत जाईपर्यंत दिवसनिहाय सखोल नियोजन करावे, उदा. आरोग्य केंद्र असावे, अग्निशमन वाहन, अम्ब्युलन्स, पोलीस चौकी कोठे असावी, नियंत्रण कक्ष कोठे असावे पाण्याचे टँकर येतात ते कोठे थांबतात, पाण्यात बिल्चिंग पावडर कोण टाकणार, तसेच संबंधित इतर विभागांकडून काय अपेक्षा आहेत. उदा. एखाद्या ठिकाणी जास्त पोलीस बंदोबस्त असणे आवश्यक वाटल्यास कळविल्यास त्यानुसार कार्यवाही करता येतात, याबाबतचा शास्त्रोक्तदृष्टया मुल्यमापनानुसार गरजांचा आराखडा दोन महिन्यात सर्व विभांगांनी तयार करावा म्हणजे वेळेत शासनाकडे  लागणा-या मनुष्यबळाची व लागणा-या गरजाबाबतची माहिती वेळेत सादर करता येईल.
        यामध्ये नगरपरिषदेची खुप महत्वाची जबाबदारी सर्वांनी या कामास प्राधान्य देण्याचे आवाहन डॉ. गेडाम यांनी केले. याप्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी पंढरपूर वारीसाठी पोलीस विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या नियोजन आराखड्याची माहिती देवून मार्गदर्शन केले.  या बेठकीस जिल्ह्यातील विविध विभागांचे प्रमुख अधिकारी, प्रांताधिकारी, न.प.चे मुख्याधिकारी उपस्थित होते.

 
Top