उस्मानाबाद - एका  महिला तहसिलदाराच्‍या  विनयभंग प्रकरणी  उपविभागीय अधिकारी तथा उपजिल्‍हाधिकारीविरूध्‍द   परंडा पोलीस ठाण्यात शुक्रवार रोजी  विनयभंग व अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.या घटनेमुळे उस्‍मानाबाद जिल्‍हयात एकच खळबळ उडाली आहे. दरम्‍यान याप्रकरणी उपविभागीय अधिकार्‍याविरुद्ध कठोर कारवाईची मागणी सदर महिला अधिकार्‍याने जिल्हाधिकार्‍यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.
 भूमचे उपविभागीय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सुनील महेंद्रकर असे गुन्‍हा दाखल झालेल्‍या आधिका-याचे नाव आहे. यातील परंड्याच्या महिला तहसिलदार आपल्या शासकीय निवासस्थानी, तब्बेत बरी नाही, म्हणून गुरूवारी रात्री सात ते साडेसातच्या दरम्यान आराम करीत होत्या.घरी कोणीच नसल्याची संधी साधून,भूमचे उपविभागीय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सुनील महेंद्रकर हे त्यांच्या घरी गेले आणि दरवाजा खटखटू लागले.यावेळी या महिला तहसिलदारांनी दरवाजा उघडला नाही,हे पाहून त्यांनी खिडकीतून आवाज काढून,लज्जा वाटेल असे कृत्य केले,ते ऐवढ्यावर न थांबता त्याचा दरवाज्यावर लाथा मारून दरवाजा उघडला आणि त्यांना लज्जा वाटेल असे अशोभणीय वर्तन केले.या प्रकरणी सदर महिला तहसिलदारांनी शुक्रवारी परंडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर उपविभागीय अधिकारी सुनील महेंद्रकर यांच्याविरूध्द भा.दं.वि.५११,४५२,३५४ अन्वये विनयभंग आणि अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
फिर्याद देण्यापूर्वी या पीडित महिलेने जिल्हाधिकार्‍यांना अर्ज पाठवून व्यथा मांडली होती. या अर्जावरून सदर महिलेची सर्वच बाजूंनी कोंडी झाल्याचे दिसते. सदर महिला अधिकार्‍याने जिल्हाधिकार्‍यांना पाठविलेल्या पत्रात मोठय़ा मुलीचा अपघात झालेला असून, तिच्यावर अजूनही उपचार सुरू आहेत. तर छोट्या मुलीस जन्मत:च हृदयविकार असल्याने तिची देखभाल करण्याची जबाबदारीही आपल्यावरच असल्याचे म्हटले आहे.त्यातच पती नोकरीनिमित्त कोल्हापूरला असल्याने प्रतिकूल परिस्थिती असतानाही आदेशानुसार मी परंडा येथे रुजू झाले. तेथील शासकीय निवासस्थानात एकटीच राहत असून, महिन्यातील दुसर्‍या व चौथ्या शनिवारी कुटुंबियाच्या भेटीसाठी निवासी नायब तहसीलदारांकडे पदभार देऊन जात होते. विशेष म्हणजे या कौटुंबिक अडचणींचा सामना करीत असतानाच अंतिम वेतन प्रमाणपत्र मिळालेले नसल्याने सुमारे चार महिन्यापासून वेतनही मिळालेले नाही. या सर्व अडचणीमुळे परंडा येथे रुजू झाल्यानंतर सततच्या तणावामुळे मागील दोन महिन्यापासून उच्च रक्तदाबाचा त्रास सुरू झाल्याचे सांगत, यामुळेच डॉक्टरांनी बेडरेस्टचा सल्ला दिला आहे. म्हणूनच ७ ऑक्टोबरपासून आपण वैद्यकीय रजेवर गेल्याचे व रजा आरपीडी पोस्टाने जिल्हाधिकार्‍यांकडे पाठविल्याचे पत्रात नमूद केले आहे. कर्तव्याची जाणीव असल्यानेच जिल्हाधिकार्‍यांनी रजेचा पदभार इतरांकडे सोपविल्यानंतरच मुख्यालय सोडण्याचा निर्णय मी घेतला होता. त्यानुसार रजा पाठवूनही मी मुख्यालयीच होते. मात्र या कालावधीत कार्यालयात न थांबता मी निवासस्थानी बेडरेस्टवर होते. या काळात कुटुंबियांशीही संवाद होत नसताना उपविभागीय अधिकारी महिंद्रकर यांनी ८ ऑक्टोबर रोजी परंडा येथील तलाठी व मंडळ अधिकार्‍यांना फोन करून तहसीलदार कार्यालयात नाहीत, त्यांच्या घरी जाऊन पंचनामा करा व अहवाल सादर करा, असे सांगितले. त्यानंतर १0 ऑक्टोबर रोजी महिंद्रकर इतर कर्मचार्‍यांना घेऊन माझ्या घरी आले आणि दरवाज्याची कढी तसेच डोअरबेल वाजवू लागले. त्यावेळी मला चक्कर येत होती. तरीही मी उठून बसले. मात्र उपविभागीय अधिकारी महिंद्रकर आणि कर्मचारी घराभोवती चकरा मारुन घरात घुसा अन् दार तोडा, असे म्हणत होते. या प्रकारामुळे घाबरून मी दरवाजा उघडला नाही. हे कृत्य घृणास्पद, अशोभनीय तसेच गंभीर स्वरुपाचे असल्याचे सांगत, याप्रकरणी उपविभागीय अधिकार्‍याविरुद्ध कठोर कारवाईची मागणी सदर महिला अधिकार्‍याने जिल्हाधिकार्‍यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.
 
Top