सोलापूर : केंद्र शासनातर्फे राष्ट्रव्यापी सहावी आर्थिक गणना करण्यात येणार आहे. यामध्ये सर्व प्रकारचे उद्योग, व्यवसाय व सेवा यांची गणना करावयाची आहे. या गणनेचे काम चांगले व वेळेत पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी केले.

याबाबत जिल्हास्तरीय संनियंत्रण व समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम कासार यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. गेडाम म्हणाले, सहाव्या आर्थिक गणनेसाठी जिल्हास्तरावर जिल्हा सांख्यिकी अधिकारी हे संनियंत्रण अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी व तालुकास्तरावर तहसीलदार हे अध्यक्ष आहेत. सदरच्या गणनेच्या कामासाठी तहसिलदारांनी प्रगणक व पर्यवेक्षकांच्या नेमणुकीचे आदेश काढवेत. यानंतर या प्रगणक व पर्यवेक्षकांना दि. 17 ते 31 ऑक्टोबरपर्यंत तालुकास्तरावर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याबाबत काही अडचणी, शंका असल्यास जिल्हा सांख्यिकी अधिकारी यांचेशी संपर्क साधावा. तसेच त्यांच्याशी समन्वय साधून प्रशिक्षणाच्या तारखा निश्चित करण्याच्या सूचनाही डॉ. गेडाम यांनी दिल्या.

या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख उपस्थित होते. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी यावेळी संवाद साधला.
 
Top