बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : बार्शी नगरपरिषदेच्या सन २०१०-११ च्या वित्तीय वर्षाचे लेखापरिक्षण सह संचालक स्थानिक निधी लेखापरीक्षा पुणे विभाग पुणे यांच्याकडून झाल्यानंतर त्यामधील आक्षेपाधिन रकमा तसेच वसूलपात्र रकमांची कागदपत्रे बाशी नगरपरिषदेस १० मे २०१३ च्या पत्रानुसार प्राप्त झाले आहेत. १ एप्रिल ते २९ डिसेंबर २०११ पर्यंत योगेश सोपल हे नगराध्यक्ष होते, ३० डिसेंबर ते ३१ मार्च पर्यंत कादरभाई तांबोळी हे नगराध्यक्ष तर मुख्याधिकारीपदी एस.के.देसाई यांच्याकडे पदभार होता. सदरच्या कालावधीतील लेखापरिक्षणात अंदाजपत्रकीय तरतुदीपेक्षा कमी जमा रक्कम ६६३४२०३, अंदाजपत्रकीय तरतुदीपेक्षा जादा खर्चाची रक्कम ५५७०६००, प्रमाणकावर मुख्याधिकारी अथवा नगराध्यक्ष यांची स्वाक्षरी न घेता रक्कम अदा करण्यात आलेल्या ४११०९५७९, अपंगासाठी ३ टक्के रक्कम राखीव निधी न ठेवणे, मे.प्रथमेश कन्स्ट्रक्शन कंपनीस रु. २ कोटी सुसज्जता अक्ष्री (मोबीलायझेशन अँडव्हान्स) नियमबाह्यरित्या दिला, सार्वत्रिक निवडणुक २०११-१२ मध्ये मर्यादेपेक्षा जादा खर्च २२१२३५ मंजूरी न घेता करणे,मोबाईलचे बील ४४०४३, आगाऊ रक्कमा व अग्रीमधनाबाबत १०१४१२४, रोकड वहीतील शिल्लक रकमेच्या पडताळणीत कमी जादा रक्कम आढळणे, रोकडवहीतील शिल्लक व बँक पासबुकातील अखेर शिल्लक यातील तफावत, पाईपलाईनच्या कामात त्रुटीमुळे आक्षेपाधिन रक्कम ८२५८५१, वसूलपात्र २१८०४, सृजल निर्मल योजनेच्या कामातील आक्षेपाधिन रक्कम १६८९७६०१, उंच टाक्या बांधणे कामी मुदतीत काम पूर्ण न झाल्याने आक्षेपाधिन रक्कम ८९१४३५५, घनकचरा प्रक्रिया संयंत्र उभारणीतील ५१६८००० रक्कम ठेकेदारास अदा करण्यात आली. परंतु विनावापर व खत निर्मितीच्या उत्पादनातील ४० टक्के परतावा मिळत नसल्याने न.प.चे आथिक नुकसान होत आहे. भगवंत मैदानाच्या दक्षिणेकडील बाजूस दुकान संकुलाचे बांधकामातील त्रुटींङ्कुळे ६,२८,२३५, महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान अभियानांतर्गत शहरातील रस्ता कॉंक्रीटीकरण, गटारी, पदपथ, विभाज करणे प्रकल्पातील टप्पा १ चे काम २९.९५% जादा दराची निविदा मंजूर करुन, मोघमरित्या केलेली निवीदा, सुधारित अंदाजपत्रकीय रक्कमेची असल्यास प्रशासकिय मंजूरी व तांत्रीक मंजूरी न घेता २३.८९ जादा दराची निविदा मंजूर केली. निविदासोबत जोडावयाची कागदपत्रे राजपत्रीत अधिकारी यांनी साक्षांकित करणे आवश्यक असतांना न करणे, शासन हिस्सा २० कोटी रुपये स्वतंत्र खात्यांत जमा करणे आवश्यक असतांना तसे न करणे, मोजमाप नोंदवही प्रमाणित न करणे, २ कोटी रुपये ठेकेदारास सुसज्जता अक्ष्रीम दिला. परंतु मोजमाप पुस्तीकेत नोंद नाही. १०% पेक्षा जादा दराने काम केलेले असून सुधारित अंदाजपत्रकाप्रमाणे तयार करुन प्रशासकिय मंजूरी न घेता झालेल्या ४१०६०९९९ हे सर्व खर्च अमान्य करण्यात आल्याचे कळविण्यात आले आहे. सदरचा अहवाल मिळाल्यापासून चार महिन्यांत अनुपालन अहवाल देण्यात यावा, असेही कळविण्यात आले आहे. यामध्ये आलेल्या निधीचा, सर्वसामान्य करदात्यांकडून आलेल्या रकमेचा विनीयोग चुकीच्या मार्गाने झाला असून यातील वसूली संबंधीतांकडून वसूल करण्याची मागणी करणार असल्याचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी विरोधी पक्षनेते अरुण बारबोले, नगरसेवक दिपक राऊत, महेदीमियॉं लांडगे, अमोल चव्हाण आदी उपस्थित होते.