पांगरी (गणेश गोडसे) : ऊस तोडणी व वाहतुकीचे जुनेच ठरलेले दर आजही लागु आहेत. अलीकडील काळात महागाई मोठया प्रमाणात वाढली आहे. जीवनावश्यक वस्तुंच्या किंमतीत मोठी दरवाढ झाली आहे. मात्र उसतोड कामगरांच्या वास्तव वेतनात मोठी घसरण झालेली आहे. त्यामुळे त्यांच्या वेतन पातळीचे संरक्षण करण्‍यासाठी मजुरीत व वाहतुकीच्या दरात वाढ करणे गरजेचे आहे.
      बैलगाडी ऊस वाहतुकीचे दर जुनेच आहेत.अलिकडील काळात बैलगाडी व बैल जोडयाच्या किंमतीतही खुप मोठी भरीव वाढ झाली आहे. तसेच ऊस वाहतुक करणारे ट्रक, टॅक्टर आदी वाहतुक करणा-या वाहनांच्या व वाहनांच्या स्पेअर पार्टच्या किंमतीमध्ये खुप मोठी व लक्षणीय अशी वाढ झालेली आहे. तसेच रस्त्यांच्या दुरावस्थेचा तर विचार न केलेलाच बरा, अशी परिस्थती आहे. त्यामुळे ऊस वाहतुक करणाञया वाहनांच्या दरात वाढ करणे गरजेचे आहे. तसेच बैलगाडी व टेम्पो, ट्रक, ऊसतोड कामगार यांच्यातही दुजाभाव केला जातो. बैलगाडीवर ऊसतोडणी करणा-या मजुरांसाठी ऊसतोडणी करणा-या मजुरांना ऊसतोडणीचा दर कमी ठेवण्‍यात आला आहे.
    राज्यात दुर्लक्षित ठरत असलेल्या ऊसतोड कामगार व ऊस वाहतुकदार यांच्या जिवनाशी निगडीत असणा-या व कामगारांच्या जिवनामध्ये आमुलाग्र बदल घडण्‍यासाठी व कामगारांना किमान सामाजिक सुरक्षितता पुरवण्‍यासाठी एका स्वतंत्र महामंडळाची र्निर्मिती करणे गरजेचे आहे. स्वतंत्र महामंडळाच्या निर्मितीसाठी आजपर्यंत केंद्र व राज्यशासनाने वारंवार कार्यवाही सुरू असल्याचे दाखवलेले आहे. यापुर्वी दादासाहेब रूपवते समिती व महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या पंडीतराव दौड समितीनेही 2005 मध्ये दिलेल्या आपल्या शिफारसीमध्ये ऊस कामगारांसाठी स्वतंत्र विकास महामंडळाची गरज असल्यासंदर्भात शिफारस केली होती. तसेच ऑक्टोंबर 2005 मध्ये झालेल्या सामंजस्य करारात महाराष्ट्र राज्य साखर संघ ऊसतोडणी व वाहतुक कामगार संघटना यांनी संयुक्तपणे राज्यशासनाबरोबर सविस्तर चर्चा करून माथाडी कामगारांसाठी असलेल्या महामंडळाच्या धर्तीवर ऊसतोडणी व वाहतुक कामगारांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्‍यासाठी पाठपुरावा करण्‍याचे ठरले होते.
    महाराष्ट्र ऊसतोडणी व वाहतुक कामगार संघटनेच्या आग्रही मागणीमुळे तत्कालीन कामगारमंत्री गणेश नाईक यांनी दि. 17 जानेवारी 2006 मध्ये मंत्रालयात एक संयुक्त बैठक घेऊन प्रश्‍न मार्गी लावण्‍याचा प्रयत्न केला होता. कामगार खात्याच्या अधिका-यांनी ऊस तोडणी व वाहतुक कामगारांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्‍यासाठी अधिकृत प्रस्ताव तयार केला असल्याचेही नाईक यांनी त्यावेळी जाहीर केले होते. त्यानंतर तत्कालीन राज्य साखर संघाचे अध्यक्ष विक्रमसिंह घाटगे यांची भेट घेऊन स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्‍यासंदर्भात चर्चा केली होती. तेव्हा त्यांनी राज्य साखर संघाच्या बैठकीत चर्चा करण्‍याचे जाहीर केले होते. दि. 11 स्प्टेंबर 2007 मध्ये स्वतंत्र महामंडळांच्या मागणीच्या पुर्ततेसाठी मुंबईत आझाद मैदानावर धरणे आंदोलन केले होते.
 
Top