मुंबई -:  लोकराज्य मासिकाचा ऑक्टोबर महिन्याचा अंक गृहनिर्माण विशेषांक म्हणून प्रसिद्ध झाला आहे. घर ही माणसाची मूलभूत गरज आहे. घरामुळे आपल्याला स्थैर्य आणि सुरक्षितता लाभते. त्यामुळे प्रत्येकाला छोटेसे का होईना आपले घरकूल असावे असे वाटते. मात्र वाढती लोकसंख्या, वेगवान नागरीकरण आणि जागेच्या अभावामुळे घराचे स्वप्न अवघड होत आहे.  या समस्यांची जाणीव असल्याने गेल्या काही वर्षात राज्य शासनाने गृहनिर्माण या विषयाला प्राधान्य दिले आहे. सामान्य माणसाला परवडणाऱ्या दरात घर उपलब्ध होण्यासाठी अनेक योजना कार्यरत आहेत. शासकीय पातळीवरून गृहनिर्माण विषयक केल्या जाणाऱ्या अशा विविध योजनांची दखल या अंकातून घेण्यात आली आहे.
     म्हाडा, सिडको, एमएमआरडीए हे राज्य शासनाचे विभाग गृहनिर्माणाच्या क्षेत्रात महत्त्वाची कामगिरी बजावत आहेत. या संस्थांची माहिती देतानाच शासन ग्रामीण व शहरी भागात राबवित असलेल्या विविध योजनांची उपयुक्त माहिती अंकात आहे.
     याशिवाय घर घेतांना घ्यावयाची काळजी, घराचा विमा, गृहनिर्माणविषयक कायदे तसेच प्राचीन काळापासून वर्तमानापर्यंत घरांमध्ये होत गेलेले बदल अशा विविध बाबींचा आढावा घेण्यात आला आहे. गृहनिर्माण क्षेत्रातील अनेक मान्यवर लेखकांचे लेख अंकात आहेत. लोकराज्यच्या इतर अंकांप्रमाणे हा अंकही संग्राह्य आहे.
 
Top