औरंगाबाद : राज्यातील मराठा समाजाला इतर मागास या प्रवर्गामध्ये समाविष्ठ करण्यासंदर्भात मराठवाड्यातील जनतेची मते जाणून घेण्यासाठी उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखालील मराठा आरक्षण समितीची गुरुवार दिनांक 24 ऑक्टोबर  रोजी औरंगाबाद येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे.
    या बैठकीसाठी सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, आदिवासी विकास मंत्री  मधुकरराव पिचड, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, राज्यमंत्री फौजिया खान, राज्यमंत्री संजय सावकारे यांच्यासह आठ राज्यस्तरीय सदस्यांची समिती उपस्थित राहणार आहे.  औरंगाबाद येथील शासकीय सुभेदारी विश्रामगृह येथे सकाळी 11.00 वाजता आयोजित बैठकीच्या वेळी  राजकिय तसेच सामाजिक संघटनांचे नेते, प्रतिनिधी, नागरिक यांनी आपली निवेदने समितीला सादर करावीत असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
    विभागीय आयुक्तालयात मराठा आरक्षण समितीच्या दौ-यासंदर्भात पूर्वतयारीची बैठक सामान्य प्रशासन उपायुक्त डॉ. विजयकुमार फड यांच्या अध्यक्षतेखाली आज  झाली.  सामाजिक न्याय विभागाचे  उपायुक्त आर. यु. राठोड, उपजिल्हाधिकारी पांडुरंग कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस. पी. मोरे, पोलीस उपायुक्त एस. व्ही. चौगुले, संशोधन अधिकारी पी. पी. बच्छाव आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.                    
 
Top