लोहारा -:  आरोपींना शिक्षा होईल, अशी सक्षम बाजू मांडण्यासाठी एक हजार रुपयांची लाच स्वीकारणार्‍या लोहारा येथील सरकारी वकिलासह अन्य एका वकिलास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई सोमवारी दि. 28 ऑक्‍टोबर  लोहारा येथे करण्यात आली.
    अँड. शिवाजी बिराजदार, अ‍ॅड. जाधव असे लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्‍या वकिलांचे नाव आहे. तक्रारदार विठ्ठल कोकरे (रा. मार्डी, ता. लोहारा) यांचा शेतीच्या कारणावरून शेजारी असणार्‍यांबरोबर वाद झाला होता. याप्रकरणी त्यांना कुर्‍हाड व काठीने मारहाण झाली होती. याप्रकरणी लोहारा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात येऊन तपास अधिकार्‍यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. याप्रकरणाची दिनांक 28 रोजी साक्ष असल्याने याबाबत कोर्टाचे समन्स तक्रारदारास मिळाले होते. त्यानुसार तक्रारदार कोकरे या प्रकरणातील साहाय्यक सरकारी वकील अँड. शिवाजी बिराजदार यांना भेटले. या वेळी अँड.बिराजदार यांनी आरोपींना शिक्षा होईल अशी बाजू मांडण्यासाठी 1500 रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती एक हजार रुपये देण्याचे ठरले व सदरील रक्कम आणून देण्यास सांगितले. याबाबत कोकरे यांनी उस्मानाबाद येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात जाऊन तक्रार दिली. त्यानुसार सापळा रचण्यात आला. सदरील रक्कम लोहारा येथील वकील दगडू जाधव यांच्याकडे देण्यास सांगितले. त्यानुसार तक्रारदार कोकरे यांनी सदरील रक्कम अँड. जाधव यांच्याकडे दिली. त्यानंतर सदरची रक्कम अँड. बिराजदार यांनी अँड. जाधव यांच्यामार्फत लोहारा कोर्टातील कार्यालयात स्वीकारल्यानंतर दोघानांही पकडण्यात आले. दोघांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू होती. हा सापळा पोलिस निरीक्षक अश्विनी भोसले, साहाय्यक फौजदार चंद्रकांत देशमुख, पोलिस हवालदार स्वामी, पोलिस नाईक सुधीर डोरले, कॉन्स्टेबल राहुल नाईकवाडी, स्नेहा गुरव, चालक पोलिस नाईक राजाराम चिखलीकर यांनी यशस्वी केली.
 
Top