पांगरी -: विज कनेक्शनची तपासणी करण्‍यासाठी गेलेल्या विज वितरण कंपनीच्या कर्मचा-यास ग्राहकाने शिवीगाळ करुन दमदाटी करत चप्पलने मारहाण केली. तर पुन्हा गावात आल्यास बघुन घेण्‍याची भाषा वापरून शासकीय कामात अडथळा आणल्‍याची घटना मंगळवार दि. 22 ऑक्‍टोबर रोजी कारी (ता. बार्शी) येथे घडली.
    अजय तानाजी हाजगुडे (रा.कारी, ता.बार्शी) असे शासकीय कामात हस्तक्षेप केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. गोरख बापु सावंत (रा.वडगांव, जि.उस्मानाबाद) यांनी पांगरी पोलिसात फिर्याद दिली आहे.
   पांगरी येथील विज वितरण कंपनीचे कर्मचारी गोरख सावंत यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, वरिष्ठांच्या आदेशान्वये कारी गावातील विद्युत वितरण कंपनीच्या घरगुती विज कनेक्शनची तपासणी करण्‍यासाठी गेले असता त्यांना आरोपी अजय तानाजी हाजगुडे यांनी तुन्ही आमचे कनेक्शन तोडले आहे, असे म्हणुन शिविगाळ दमदाटी करत चप्पलने मारहान केली. तसेच तुम्ही परत जर गावात आले तर तुम्हाला सोडणार नाही असे म्हणुन शासकीय कामात अडथळा आणला. वीज कर्मचारी सावंत यांच्या फिर्यादीवरुन पांगरी पोलिसात हाजगुडे यांच्याविरूदध शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे. अधिक तपास पांगरी पोलिस करत आहेत.
 
Top