बार्शी -: विवाहपूर्वी इतराकडून शरीरसंबंधाने गर्भ धारणा असलेल्या पत्नीशी विवाह रद्द करण्याचा आदेश बार्शी दिवाणी न्यायालयाचे न्यायाधिश विक्रमादित्य मांडे यांनी दिला आहे.
मौजे गौराळे येथील एकाचा विवाह दि. 24 मे 2011 रोजी (मौजे हाडोंग्री, ता. भूम, जि. उस्‍मानाबाद) येथील मुलीशी झाला. हिंदु धर्मशास्‍त्र, जाती, रुढी, परंपरानुसार विवाह पार पडला. हा विवाह जमविण्‍यावेळी नातेवाईकांनी मध्‍यस्‍ती करताना मुलगी संस्‍कारक्षम, सुशील, चारित्र्य संपन्‍न असल्‍याची खात्री दिली. लग्‍नानंतर मुलीच्‍या पोटात दुखत असल्‍याच्‍या तक्रारीवरुन तिला संबंधित डॉक्‍टरांकडे नेत असताना आपल्‍या माहेरी असलेल्‍या डॉक्‍टराकडेच जाण्‍याचा हट्ट त्‍या मुलीने धरला. उस्‍मानाबाद येथील एका खासगी रुग्‍णालयात तिची शारिरीक तक्रार सांगण्‍यात आली. यावेळी तिला 25 आठवड्यांची गर्भधारणा असल्‍याचे सांगण्‍यात आले. महिला डॉक्‍टरांनी दिलेल्‍या माहितीमुळे तिच्‍या पतीला मोठा धक्‍का बसला. लग्‍नानंतर केवळ 39 दिवसांत तिला रुग्‍णालयता तपासणी केल्‍यानंतर 25 आठवड्यांची गर्भधारणा शक्‍यच नसल्‍याची खात्री झाली व आपल्‍या पत्‍नीचे शरीरसंबंध अन्‍य व्‍यक्‍तीबरोबर असल्‍याचे समजल्‍याने झालेल्‍या फसवणुकीने न्‍यायालयाकडे धाव घेतली. हिंदू विवाह कायदा 1955 च्‍या कमलम 12 मधील तरतुदीनुसार उभयतांचा विवाह रद्द असून त्‍याबाबत अर्ज दाखल करण्‍यात आला. सदरच्‍या प्रकरणी महिला डॉक्‍टरांची साक्ष तपासण्‍यात आली. गर्भातील बाळाचे मांडीचे हाड, पोटाचा परिघ यावरुन वयाची निश्चिती केल्‍याचे स्‍पष्‍टीकरण महिला डॉक्‍टरांनी न्‍यायालयासमोर केले. दोन्‍ही पक्षकारांचे म्‍हणणे व युक्‍तीवाद घेऊन न्‍यायाधिशांनी विवाह रद्द करण्‍याचा महत्‍त्‍वपूर्ण निर्णय दिला. मुलाकडून अँड. प्रशांत शेटे, अँड. सोमनाथ सावंत यांनी काम पाहिले तर मुलीच्‍या बाजूने भूम येथील अँड. बी.एस. माने यांनी काम पाहिले.
 
Top