बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : तीर्थ क्षेत्र तुळजापूर येथे नवरात्र उत्सवानिमित्‍त भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते. दरम्यानच्या काळात येडशी मार्गे उस्‍मानाबादवरुन तुळजापूर मार्गे सोलापूर व इतरत्र जाणार्‍या वाहनांची वाहतूक वळवण्यात येते व बार्शी मार्गे सर्व वाहने सोलापूरच्या दिशेने नेली जातात. सदरच्या प्रकारामुळे वाहतुकीच्या आलेल्या ताणाचा परिणाम रस्त्यावर होऊन रस्ते खराब होतात. सदरच्या खराब रस्त्यांची दुरुस्ती मत्र लवकर केली जात नाही.
     येडशीकडून आलेल्या वाहनांना बार्शीच्या अलीकडेच ५ ते ६ किलोमीटरवर असलेल्या कुसळंब जवळील टोलनाक्यावर टोल घेण्यात येतो, बार्शीपासून १० ते १५ किलोमीटर पुढे गेल्यावर असलेल्या भोगावती नदीजवळील काळेगाव येथे पुन्हा टोलची आकारणी होते. सोलापूरच्या अलीकडे ८ ते १० किलोमीटरवर पुन्हा टोल वसूली केली जाते. सदरच्या प्रकारामुळे या पंधरा दिवसांत मोठ्या प्रमाणात वाहन धारकांच्या खिशाला कात्री लागते. सदरच्या तीनही टोलपैकी भोगावती नदीजवळचा टोल मात्र संशयास्पद आहे. सदरच्या टोलसाठी यापूर्वी अनेक वेळा अनेकांच्या तक्रारी झाल्या असून सदरचा टोल हा मुदत संपल्यावरही सुरुच होता व बेकायदा पुन्हा सुरु करण्यात आल्याने याची चौकशी करण्यात यावी अशा तक्रारीनंतर संबंधीत अधिकारी जागे झाले व त्या ठेकेदाराचे हितसंबंध जोपासून त्याला पुन्हा मुदतवाढ दिल्याचे तक्रारदारांकडून सांगण्यात येते. कित्येक वर्षांपासून टोलची वसूली करण्यात येणार्‍या ठिकाणी परवडत नसल्याचे तसेच अपेक्षीत वसूली झाली नसल्याची कारणे दाखवून पुन्हा वसूली करण्यात येते. कुसळंब जवळील असलेल्या टोलनाक्यावर देखिल अशाच प्रकारची मनमानी करुन बार्शी तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी व वाहनचालकांचा खिसा कापला जात होता. वाहनांना ठराविक नेत्यांची छायाचित्रे लावली की त्या वाहनास कसलीही आकारणी नाही, सर्वसामान्य आला की पहिल्यांदा टोल द्या मग पुढे जा, अनेक वेळा टोलवर ठेवण्यात आलेल्या लोकांकडून सर्वसामान्यांना शिवीगाळ केली जाते व वारंवार तक्रारी होत होत्या. एका तक्रारदाराने तर चक्क बार्शी न्यायालयासमोर आत्‍मदहन करण्याचा प्रयत्न केला. सदरच्या प्रकारानंतर खुद्द पालकमंत्री ना. दिलीप सोपल यांनी लक्ष घालून सदरच्या ठिकाणचा बेकायदा व जाचक टोल संपूर्ण बार्शी तालुक्यातील वाहनांसाठी माफ करुन घेतला. सदरच्या ठिकाणी बार्शी तालुक्यातील वाहनांना टोल नसल्याचा फलकही लावण्यात आला आहे. टोलची नेमकी वसूली किती केली जाते. येणे बाकी किती आहे व किती पावत्या फाडण्यात आल्या याचा लेखाजोखा मात्र अद्ययावत केला जात नाही. सध्याच्या यात्राकाळात दररोज सुमारे तीन हजार मोठी वाहने या रस्त्यावरुन जातात परंतु या वाहनांकडून नेमकी किती वसूली केली जाते व शासनदरबारी किती वसूली झाल्याचे दाखवले जाते याचा हिशोब तपासणे गरजेचे आहे.
 
Top