नळदुर्ग -: येथील सय्यद अब्दुल्ला शाह मेमोरीयल उर्दू शाळेत बेकायदेशीररित्या शालेय पोषण आहाराचा 83 क्विंटल 50 किलो तांदूळ व अन्य साहित्य सापडले आले होते. याप्रकरणी अखेर शाळेच्‍या मुख्‍याध्‍यापिकेस निलंबित करण्‍यात आले आहे. तसेच दोषींवर गुन्हा दाखल करण्यासाठी अहवालही सादर करण्यात आला आहे.
    नळदुर्ग येथील उर्दू शाळेत शालेय पोषण आहारातील 83 क्विंटल 50 किलो तांदूळ, 150 मुग, 33 तूरदाळ, 31 हळद, 14 जिरे, 52 मोहरी, 242 मिरची पूड, 25 तेल, 40 वटाणा, 70 किलो मटकी हे साहित्य सापडले. दि. 14 व 15 सप्टेंबरला हे साहित्य तुळजापूर येथील पथकाने हस्तगत केले. हे साहित्य काळ्या बाजारात विक्रीसाठी ठेवले असल्याची चर्चा नागरिकांत होती. मात्र, शिक्षण खात्‍याने हे साहित्य ताब्यात घेतल्यामुळे काळाबाजार करण्याचे संबंधितांचे पितळ उघड झाले. दरम्‍यान याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची प्रक्रिया संथगतीने सुरू आहे. याप्रकरणी चौकशी समिती नियुक्त करून वेळ मारून नेण्‍यात येत होता. ही समिती चौकशी करण्‍याच्‍या नावाखाली एक महिना उलटला तरी अहवाल देण्यास  दिरंगाई होताना दिसुन आल्‍याने पालकांत जोरदार चर्चा होती.
    शिक्षण खात्‍याने संबंधिताना पत्र देऊन शाळेच्‍या मुख्याध्यापकास निलंबित करण्याचे आदेश दिले. त्यानंतर संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी संबंधित मुख्याध्यापिका महेबुबी शेख यांना निलंबित केले आहे. महाराष्ट्र खासगी शाळेतील कर्मचारी सेवेच्या शर्ती व नियम 1981 (3) तरतुदीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये खरे दोषी कोण आहेत, याचाही शोध घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.
 
Top