पंढरपूर -: श्री विठ्ठल - रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित संगीत महोत्सवात ललिता पंचमीच्या दिवशी  सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना शमा भाटे यांच्या शिष्या शीतल कोतलवारकर यांच्यासह कलाकारांनी सादर केलेल्या कथ्थक नृत्याने रसिक मोहित झाले. त्यांनी या नृत्यात पदलालित्यातून एक तालातील विलंबित बंदिशीमध्ये अमन, तत्कार आणि अमोघ या तालांचा आविष्कार घडविला.
    प्रारंभी जयवंत महाराज बोधले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. 'काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल' या अभंगावर कोतलवारकर यांनी आपल्या शिष्या मुग्धा खिरे - पोटभरे , मानसी नाईक व आदिती बोडस यांच्यासमवेत कथ्थक नृत्य सादर केले. त्यानंतर पंडित विजय घाटे रचित फमकाबाद चरणामध्ये तीन तालामध्ये तत्कार दाखविले. हे नृत्य सादर करताना त्यांनी लयीचे विविध प्रकार सादर केले. पंडित भीमसेन जोशी यांच्या 'कृपा सरोवर कामल मनोहर' या अभंगावर कथ्थक नृत्यातील बारकावे, हावभाव, मुद्राभिनय, चलननृत्याचे दर्शन घडविले. त्यानंतर 'श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे आणि गोविंद दामोदर माधव येती' यावरील नृत्याविष्कार व अभिनयातून त्यांनी कृष्णाच्या विविध लीला रसिकांसमोर उभ्या केल्या. कार्यक्रमाची सुरुवात पंढरपूरची उदयोन्मुख कलाकार गायत्री कटेकर हिच्या भरतनाट्यम नृत्याने झाली. तिने 'अयिगिरी नंदिनी नंदित मेदिनी.' या महिषासूर मर्दिनी स्तोत्रावर सुरुवात केली. तिच्या नृत्याला रसिकांनी दाद दिली.
 
Top