मुंबई -:  गेल्या दोन दशकाहून अधिक काळ क्रिकेटच्या मैदानावर अधिराज्य गाजविणारा मास्टर-बलास्टर सचिन तेंडुलकरने वेस्टइंडिज विरुध्दच्या मालिकेनंतर निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. विक्रमवीर सचिन तेंडुलकर पुढील महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध होणा-या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेनंतर निवृत्त होणार आहे. बीसीसीआयने ट्विटरवरून काही वेळापूर्वीच ही घोषणा केली आहे. १४ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत वेस्ट इंडिजविरुद्ध मायदेशात दुसरी कसोटी खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर आपण कसोटीतून निवृत्ती घेणार असल्याचं सचिनने बीसीसीआयला कळविले आहे.
     "मी आयुष्यभर भारतासाठी क्रिकेट खेळण्याचं स्वप्न जोपासलं. गेल्या २४ वर्षांपासून प्रत्येक दिवस मी हे स्वप्न जगतो आहे. मी क्रिकेटशिवाय आयुष्याची कल्पनाच करू शकत नाही. कारण वयाच्या अकराव्या वर्षापासून मी क्रिकेटच खेळत आलो आहे. देशाचं प्रतिनिधित्व करणं आणि जगभर खेळण्याची संधी मिळणं हा मी माझा बहुमान समजतो. मी दोनशेवी कसोटी खेळण्यासाठी उत्सुक आहे. त्यानंतर मी निवृत्ती घेत आहे. मला योग्य वाटेल तेव्हा निवृत्ती घेण्याची संधी दिल्याबद्दल बीसीसीआयचे आभार मानतो. माझ्या कुटुंबियांनी दाखवलेला संयम आणि समजुतदारपणासाठी त्यांचेही आभार. माझ्यासाठी प्रार्थना करणाऱ्या चाहत्यांचे आभार. त्यांच्या शुभेच्छांनी मला चांगलं खेळण्याची प्रेरणा दिली". असे सचिनने सांगितले आहे.
 
Top