उस्मानाबाद -: शहर व परिसरातील हजारो भाविक-भक्‍तांचे श्रध्‍दास्‍थान असलेल्‍या धारासुरमर्दिनी देवी हे एक जागृत देवस्‍थान म्‍हणून सांगितले जाते. नवरात्र महोत्सवात भाविकांची देवीच्‍या दर्शनासाठी मोठी गर्दी होते. नवरात्रोत्‍सवाच्‍या कालावधीत विविध धार्मिक व सांस्‍कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहाने दरवर्षी साजरा केला जातो. याप्रसंगी शहर व परिसरातील देवीचे हजारो भक्‍त या उत्‍साहात सहभागी होतात.
    उस्‍मानाबाद शहरवासियांचे ग्रामदैवत असलेल्‍या धारासुरमर्दिनी देवीच्या मंदिरास ऐतिहासिक, प्राचीन इतिहासाचा वारसा लाभलेला असून या देवस्थानबाबत जेष्‍ठ नागरिकांडून आजही अख्यायिका सांगण्‍यात येते. पूर्वीच्‍या काळी  उस्मानाबाद शहराचे नाव 'धाराशिव' असे होते. उस्मानाबाद येथे धारासूर हा तर तुळजापूर येथे म्हैशासूर नावाचा राक्षस राहत होता. या दोघा राक्षस बंधूंनी आपल्या भागाची हद्द ठरवून घेतली होती. त्यानुसार धारासूर राक्षसाच्या हद्दीतील भागाला धाराशिव या नावाने संबोधले जाते. याच नावावरून उस्मानाबाद शहरास जुन्या काळातील लोक धाराशिव या नावाने ओळखायचे. या दोन्ही राक्षसाला माता पार्वतीने तुळजापूर येथे म्हैशासूराचा वध केला, तर उस्मानाबाद येथे धारासूराचा वध केला. तेव्हापासूनच पार्वतीस धारासूर मर्दिनी देवी या नावाने ओळखले जाते. आजही अनेकजण उस्‍मानाबाद शहराला धाराशिव म्‍हणून संबोधतात.
    निजामाच्या राजवटीत उस्मान रझवी या निजाम राजाने उस्मानाबाद शहरावर अधिराज्य केल्‍याचे इतिहासात उल्‍लेख आहे. त्यामुळे पुन्हा धाराशिवचे उस्मानाबाद असे नामकरण झाले. उस्मानाबाद येथे धारासूर मर्दिनी देवीचे पुरातन मंदिर आहे. पंधरा वर्षापुर्वी हे मंदीर जिर्णोध्दारापासून वंचित होते. त्यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब डोके यांच्या पुढाकाराने परिसरातील भक्तांनी व नागरीकांनी जिर्णोध्‍दाराचा संकल्प केला. लोक सहभागातुन मंदीराचा विकास करण्‍यात आला. पंधरावर्षापासून या मंदीराचा ट्रस्टच्या माध्यमातुन मोठा विकास झाला असून भक्तांच्या देणगीतुन आज भव्य असे मंदीर उभारले गेले असून आजही मंदीराच्या जिर्णोधाराचे काम सुरुच आहे.
    लोकांच्या देणगीबरोबरच पर्यटन विकास निधीअंतर्गत या मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आलेला आहे. दरवर्षीच नवरात्र महोत्सवाच्या कालावधीत या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम घेतले जातात. या काळात शहरासह परिसरातील भाविक धारासूर मर्दिनी देवीचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी करतात.
 
Top