बार्शी -: येथील तुळजापूरला दर्शनासाठी जाणार्‍या भाविकांच्या वाहनाची तपासणी करणार्‍या वाहतूक पोलिस आणि वाहन चालकांच्या झालेल्या हाणामारीत दोघेही जखमी झाले असून यातील चालकावर बार्शी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  रविवारी दुपारी १२ च्या आसपास बार्शी येथील भवानी पेठेतील पोस्ट ऑफिस चौकात सदरचा प्रकार घडला.
    संजय विलास घोडके (रा. आकाशवाणी जवळ, टिकवडे, हडपसर, पुणे) असे यातील वाहन चालकाचे नाव आहे. घरातील लहान मुले, स्त्रीया, आजारी व्यक्तीसह नातेवाईकांना बरोबर घेऊन निघालेल्या वाहनाचे मालक तथा चालक घोडके हे तुळजापूरच्या दिशेने जात होते. यावेळी वाहतूक पोलिस संजय चंदनशिवे यांनी सदरचे  वाहन (क्र. एम.एच.१२ जे झेड ०१६५) हे अडवून कागदपत्रे दाखवा, वाहनात जादा व्यक्ती असल्याने दंडात्‍मक कारवाई करण्यात येणार असल्याचे म्हटले. यावेळी त्या भाविकांनी आम्ही तुळजापूरला निघालो आहोत. आमच्या सोबत लहान मुले व परिवार आहे आम्हाला दंड करु नका असे सांगत असतांना चालक आणि पोलिसांतील शाब्दिक चकमकीला सुरुवात झाली. यावेळी चालकाची पत्नी ५० रुपये ओवाळून घे असे म्हणून ५० रुपये पोलिसांच्या दिशेने पुढे केली. सदरच्या चकमकीनंतर पोलिसाने चालकाला धरुन बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला. सदरच्या प्रकाराने रस्त्यावर मोठी गर्दी जमा झाली. यावेळी दोघांमध्ये सुरु झालेल्या भांडणात रस्त्याच्या कडेला असलेली सायकल उचलून एकमेकांवर मारण्याचा प्रकार सुरु असतांना दोघेही जखमी झाले. रस्त्यावर जङ्का झालेल्या गर्दितील व्यक्तींनी दोघांची भांडणे सोडविली, अशी माहिती जमा झालेल्या गर्दीतील व्यक्तींनी दिली.
    सदरच्या प्रकारानंतर वाहन बार्शी पोलिस ठाण्यात नेण्यात आले. यावेळी पोलिस निरीक्षक सालार चाऊस यांनी सदरचा प्रकार शांतपणे ऐकूण घेतला. यावेळी वाहन चालक हा झालेल्या चुकीमळे मोठा अनर्थ झाला असून आम्हाला माफ करा, मागील कित्येक वर्षांपासून पोलिसांत येण्याची वेळ आपल्यावर आली नसून आपल्याला माफ करावे, असा प्रकार आयुष्यात पुन्हा कधीच होणार नाही अशी गयावया करु लागला. आमचा वाद मि‍टवा व आम्हाला तुळजापूरला जाण्याची परवानगी द्या अशी विनंती करु लागला. यावेळी वाहतूक पोलिस चंदनशिवे यांनी सदरच्या प्रकाराची तक्रार दिली व गुन्हा नोंद झाला.  ३५३, ३३२, ५०६, मो.व्हे.ऍ. ६६,१, १९२ नुसार गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास कोटवाळे हे करीत आहेत.
 
Top