उस्मानाबाद : नागरिकांच्या थेट हिताशी निगडीत असणा-या विभागांच्या योजनांची यशस्वी अंमलबजावणी व्हावी, यासाठी राबविलेल्या समाधान योजना उपक्रमास लोहारा तालुक्यातील माकणी येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी या उपक्रमांच्या आयोजनाबद्दल कौतूकोद्गार काढले. उस्मानाबाद जिल्हा निर्मल जिल्हा म्हणून ओळखला जावा यासाठी सर्व लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील सर्व अधिकारी व कर्मचा-यांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज यावेळी त्यांनी व्यक्त केली. 
             लोहारा तालुक्यातील माकणी  येथे भारत विद्यालयात आयोजित महसूल व वन विभाग, तहसील कार्यालय,लोहारा  येथे सुवर्ण जयंती राजस्व अभियान समाधान योजना कार्यक्रमाचे उदघाटन श्री.चव्हाण यांच्याहस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ.सुभाष व्हट्टे, खासदार पद्मसिंह पाटील, आमदार ज्ञानराज चौघुले, लोहारा पंचायत समिती सभापती असिफ मुल्ला, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनकर जावळे, सुरेश बिराजदार, अशोक जवळगे, जि.प.सदस्य दिपक जवळगे, हरिष डावरे, बाबुराव राठोड, प.स.सदस्य लताताई घोडके, सरपंच महादेव बंडगर यांच्यासह  जि.प. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.हजारे, उमरगा उपविभागीय अधिकारी व्ही.एल.कोळी, तहसीलदार शशीकांत गायकवाड यांची यावेळी उपस्थिती होती.
          पालकमंत्री चव्हाण म्हणाले की, जिल्हा हागणदारी मुक्त न झाल्यामुळे शासनाच्या अनेक योजनेपासून वंचित राहण्याची वेळ आपल्यावर येत आहे. योजनांचा निधी असूनही जिल्हा हागणदारी मुक्त का होऊ शकत नाही, असा सवाल करुन यासाठी जिल्ह्यातील ग्रामसेवकांची कार्यशाळा घेऊन लोकप्रतिनिधींनी लक्ष घालण्याची गरज असल्याचे प्रतिपादन श्री. चव्हाण यांनी केले.
       समाधान योजनेच्या माध्यमातून जनता आणि शासन व महसूल विभागाचा संवाद व परिसंवाद व्हावा आपल्या विविध प्रकारचे प्रलंबित कामे या माध्यमातून करावीत. शासनाच्या विविध योजनांचा नागरिकांना थेट लाभ मिळावा, प्रशासनाविषयी सकारात्मक दृष्टीकोनातून नागरिकांची कामे व्हावीत हा या समाधान योजना उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. माकणी महसूल मंडळातील नागरिकांनी याठिकाणी केलेल्या गर्दीने ही अपेक्षा सार्थ ठरवली. विविध शासन योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत घेऊन जाते, ही बाब कौतुकास्पद असल्याचे पालकमंत्री चव्हाण त्यांनी सांगितले.
          यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात विविध योजनातील लाभार्थींना अनुदानाचे धनादेश, प्रमाणपत्रे, खेड येथील हक्क अभिलेख (कबाला) वाटप आणि साहित्याचेही वाटप केले.
        शाळेच्या प्रांगणात महसूल, आरोग्य, कृषी, शिक्षण, समाजकल्याण तसेच जिल्हा परिषदेच्या विविध विभागांची दालने उघडण्यात आली होती.  त्या-त्या ठिकाणी संबंधित नागरिकांना त्यांना आवश्यक ती कागदपत्रे देण्यात येत होती. विविध योजनांसाठी असणारे अर्ज भरुन घेण्यात येत होते. स्पर्श रुग्णालयाच्या वतीने विद्यार्थ्यांना सौर दिवे वाटप  करण्यात आले. जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीनेही शासनाचे मुखपत्र असणाऱ्या लोकराज्य मासिकाची अंक विक्री तसेच सभासद नोंदणीची सुविधा या ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आली. पालकमंत्री चव्हाण, जि.प.अध्यक्ष व्हट्टे, खासदार पाटील,आ.चौघुले यांच्यासह इतर मान्यवरांनी या सर्व दालनांना भेटी देऊन नागरिकांना देण्यात येत असणाऱ्या सुविधांची माहिती घेतली.
       खासदार पाटील यांनी  महसूल मंडळातील प्रलंबित कामे समाधान योजनेतून पूर्ण करावीत. महसूल विभाग सुवर्ण जयंती अभियानातून लोकाभिमुख कामे करत आहे. याचा  सर्व नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन केले. जि.प.अध्यक्ष डॉ.व्हट्टे म्हणाले की,  या समाधान योजनेतून शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती घ्यावी व ती जास्तीत जास्त राबविण्याचा प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले तर आमदार चौगुले यांनी जनतेला शासनाच्या योजनांची माहिती एका छत्राखाली होणार आहे. त्यांचा प्रत्येकांनी सर्व स्टॉलवर लाभ घ्यावा,असे आवाहन केले.
     प्रास्ताविक तहसीलदार गायकवाड यांनी केले नायब तहसीलदार मुस्तफा खोंदे यांनी आभार मानले                                                 
 
Top