नळदुर्ग : श्री तुळजाभवानी मातेच्‍या शारदीय  नवरात्रोत्सवानिमित्त दर्शनासाठी नळदुर्गमार्गे श्री क्षेत्र  तुळजापूरकडे अनवाणी पायी चालत जाणार्‍या भाविकांना खराब रस्‍त्‍यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तर बहुतांश भाविक नळदुर्ग मार्गे न जाता  शॉर्टकट रस्त्याचा मार्ग स्विकारल्‍याने  दरवर्षी पायी चालणार्‍या भाविकांच्या गर्दीने नळदुर्गातील रस्‍ते फुलून जाणारे रस्ते यावर्षी मात्र ओस पडल्‍याने चित्र दिसत आहे. राष्‍ट्रीय महामार्गावरील जळकोट शिवारातील मोरे पुलापासून मुर्टा मार्गे बोरी धरणापर्यंतच्या पाऊलवाटेने मधला मार्ग शोधून भाविकांनी जवळपास आठ किलोमीटर अंतर कमी केले आहे.
       राज्‍यासह परप्रांतातील भाविक मोठय़ा संख्येने श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी जात आहेत. भाविकांना अन्नदान करण्यासाठी मार्गावर अनेक स्वयंसेवी संस्था, दानशूर ग्रामस्थांनी जलपान, चहा, फराळ, निवारा आदींची सोय केली आहे. परंतु भाविकांनी मधला मार्ग शोधल्याने जळकोट-नळदुर्ग मार्गावर भाविकांची वर्दळ नसल्‍याचे दिसून येत आहे. 
      नळदुर्ग-तुळजापूर रस्त्यावर अन्नदान करण्यासाठी अनेक अन्नदाते पुढे आले असले तरी भाविकांना निवार्‍याचा प्रश्न भेडसावत आहे. नळदुर्ग ते तुळजापूर पर्यंतच्या रस्त्यावर पायी जाणार्‍या भाविकांना पिण्याच्या पाण्याचाही त्रास सहन करावा लागत आहे. अचानक पाऊस आला तर भाविकांना निवार्‍यासाठी कसलीही सुविधा उपलब्‍ध नाही.
 
Top