कळंब (बालाजी जाधव) -: सन 2011 व 2012 मध्‍ये प्रशासकीय व विनंतीने बाहेर तालुक्‍यात बदलून गेलेल्‍या शिक्षकांना त्‍यांची इच्‍छा असेल तर मुळ तालुक्‍यात आपआपसात बदलीने येण्‍याची संधी निर्माण करुन दिली जाईल, असे आश्‍वासन राज्‍याचे ग्रामविकास मंत्री ना. जयंत पाटील यांनी प्राथमिक शिक्षक संघाच्‍या पदाधिका-यांच्‍यासमवेत झालेल्‍या बैठकीत दिले असल्‍याची माहिती शिक्षक संघाचे प्रदेश कार्याध्‍यक्ष बाळकृष्‍ण तांबारे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
    महाराष्‍ट्र राज्‍य प्राथमिक शिक्षक संघाच्‍या राज्‍यस्‍तरीय पदाधिकारी यांच्‍यासमवेत राज्‍यातील शिक्षकांच्‍या विविध प्रश्‍नावर चर्चा करुन निर्णय घेण्‍यासाठी राज्‍याचे ग्रामविकास मंत्री ना. जयंत पाटील यांच्‍या अध्‍यक्षतेखाली दि. 17 ऑक्‍टोबर रोजी बांधकाम भवन, मुंबई येथे बैठक संपन्‍न झाली. या बैठकीस ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एस.एस. संदू, उपसचिव सुर्वे, खासगी सचिव सुभाष लाखे, कक्षाधिकारी देशपांडे, अधिक्षक संजय कुडवे, शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात, राष्‍ट्रीय कार्याध्‍यक्ष एस.डी. पाटील, प्रदेशाध्‍यक्ष राजाराम वरुरे, प्रदेश कार्याध्‍यक्ष बाळकृष्‍ण तांबारे, प्रदेश सरचिटणीस केशव जाधव, कोषाध्‍यक्ष अंबादास वाजे आदीजण उपस्थित होते.
    यावेळी सन 2011 व 2012 मध्‍ये प्रत्‍येकी वर्षी पाच टक्‍के प्रशासकीय व पाच टक्‍के विनंती बदल्‍या तालुका बाहेर करण्‍यात आल्‍या. सन 2013 मध्‍ये तालुकाबाहेर होणा-या बदल्‍या थांबवण्‍यात आल्‍या. त्‍यामुळे पुर्वी तालुका बाहेर प्रशासकीय बदलीने गेलेल्‍या शिक्षकांची मोठी गैरसोय झालेली असून पती-पत्‍नी वेगवेगळ्या तालुक्‍यात गेल्‍याने कुटुंबाची हेळसांड होत असल्‍याने त्‍यांचा अध्‍यापनावर प्रतिकुल परिणाम होत आहे. तसेच काही शिक्षक राहत्‍या गावापासून 70 ते 100 किलोमीटरवर गेल्‍याने त्‍यांच्‍या मानसिकतेवर त्‍याचा परिणाम होत आहे. ही बाब ना. पाटील यांच्‍या निदर्शनास आणून दिली असता, ना. पाटील यांनी सन 2011 व 2012 मध्‍ये प्रशासकीय किंवा विनंती बदलीने दुस-या तालुक्‍यात गैरसोयीच्‍या ठिकाणी गेलेल्‍या शिक्षकांना त्‍यांनी आपआपसात बदलीसाठी दोघांनी एकत्रित विनंती अर्ज दिल्‍यास अशा शिक्षकांच्‍या बदल्‍या करण्‍यास मान्‍यता दिली असून या बदल्‍या 18 नोव्‍हेंबर म्‍हणजे दिवाळी सुट्टीमध्‍ये केल्‍या जातील. या बदल्‍या करण्‍याबाबतचे आदेश जिल्‍हा स्‍तरावर 30 ऑक्‍टोबर पूर्वी निर्गमित करावेत, अशा सूचना ग्रामविकास विभागातील अधिका-यांना दिल्‍या असल्‍याने तांबारे यांनी पत्रकात म्‍हटले आहे.
 
Top