बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : येथील शालेय विद्यार्थ्यास तोंडाला रुमाल बांधलेल्या दोघा अज्ञातांनी दुचाकीवर पळवून नेण्याचा प्रयत्न विद्यार्थ्याच्या सतर्कतेमुळे फसला आहे. या घटनेमुळे बार्शी शहर व परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
    अँटोरिक्षा चालवून उदरनिर्वाह करणार्‍या तानाजी अर्जुन यांचा मुलगा सिध्दनाथ (रा. वायकुळे प्लॉट, टेलिफोन नगर, बार्शी) असे त्या शालेय विद्यार्थ्याचे नाव आहे. महाराष्ट्र विद्यालयातील इयत्ता सहावीमध्‍ये तो शिक्षण घेत आहे. नाईकवाडी प्‍लॉट मध्‍ये खासगी घेणा-या जगताप यांच्‍या शिकवणीला सकाळी साडे आठच्‍या सुमारास घरातून गेलेला हा विद्यार्थी पावणेदहाच्या सुङ्कारास शिकवणीहून घराकडे परतत होता, एकशिंगे यांच्या घराजवळ आल्यानंतर त्यावेळी हा प्रकार घडला. पाठीमागून दुचाकीवरील भरधाव वेगाने येणार्‍या दोघा अज्ञातांनी सिध्दानाथ याच्या तोंडावर रुमालासारखे कापड टाकून बेशुध्द केले. त्या विद्यार्थ्याला दोघांच्या मध्ये बसवून बायपासवरुन गावाच्या बाहेर नेण्यात आले. कुर्डूवाडी रोडवरील ऋतु गार्डनजवळ आल्यानंतर त्या विद्यार्थ्याला थोडीशी शुध्द आली. आपल्याला कोणीतरी पळवून नेत आहेत, याची त्‍यास खात्री होताच यातुन कसे सुटायचे याबाबत विचार करून निणर्य घेतला .
    सिध्‍दनाथ यास पळवून नेणारे दोघेही  १८ ते २३ वर्षे वयोगटाचे होते.  एकाच्या अंगात पांढरा सदरा, जिन्सची पॅन्ट, तर  दुसर्‍याच्या अंगात लाल हाप बाह्यांचा शर्ट असून ते हिंदी  भाषेत   संभाषण करत होते. कुर्डूवाडी रोडवरील  बाळूमामा मंदिराजवळ आल्यानंतर  त्‍यांचे   वाहन रस्त्याच्या कडेने हळू जात होते, यावेळी विद्यार्थ्याने पाठीमागे बसलेल्या व्यक्तीला आपल्या हाताच्या कोपर्‍याने  जोरात ठोसा दिला. त्यामुळे तो गाडीवरुन खाली पडला. यासंधीचा  विद्यार्थ्याने  फयादा घेत  उडी टाकून पळ काढला. यावेळी त्या दोघांनी त्याचा पाठलाग सुरु केला.  रानातील गुरे चारणार्‍या गुराख्याजवळ जाऊन त्या विद्यार्थ्याने मला वाचवा असे म्हणत रडू लागला. यावेळी पाठीमागून पाठलाग करणारे दोघेही मागच्या मागे पळून गेले. सदरच्या प्रकारानंतर त्‍या  गुरे चारणार्‍या व्यक्तीने त्या भागातील राहणार्‍या ओळखीच्या व्यक्तीमार्फत त्या विद्यार्थ्याला घरी पोहोचविण्याची व्यवस्था केली. तोपर्यंत त्याचे पालक सर्वत्र शोधाशोध करुन हताश झाले होते. रात्री साडेबारा ते एकच्या दरम्यान आपला मुलगा सुखरुप परत आल्याने त्याच्या नातेवाईकांच्या जीवात जीव आला व त्याच्याकडून हकिकत ऐकून त्यांनाही रडू कोसळले.
   
    बार्शीतील लहान मुले सुरक्षित नसल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. महाराष्ट्र विद्यालयातील एका शालेय विद्यार्थ्यी गायब झाला त्याचा अद्यापही थांगपत्ता नाही, अनेक शाळेतील  रॅगींगचे प्रकार व अश्‍लील चाळ्यांचे प्रकार जे राजकिय वरदहस्ताने जागच्या जागी दबले आहेत अथवा जातीय तेढ नको म्हणून आलेल्या धमक्यांनी दबले असतील. लहान मुलांच्या बाबत पालकांमध्ये जागरुकता असणे गरजेचे आहे. जे शिक्षक शाळेत शिकवतात तेच आपल्या शिकवण्यांचा धंदा करुन विद्यार्थ्यांना धमक्या देऊन आपला व्यवसाय तेजीत चालावा म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करतात त्यांच्याविरुध्द मात्र कोणतीही कठोर कारवाई केली जात नाही. वरपासून खालपर्यंत जेवणावळी आणि मलिदा चारुन स्वत:ला सुरक्षित करुन घेत असल्याने यांच्यावर नेमकी कोण कारवाई करणार हा प्रश्‍न कायमस्वरुपी अनुत्तरीतच राहिला आहे. मग नामांकित कॉलेज, संस्‍थाही याला अपवादात्‍मक नाहीत. एका संस्थेच्या महाविद्यालयात तर स्वतंत्र अकौंटद्वारे बारावीच्या विद्यार्थ्यांची शास्त्र विषयाची दुकानदारी सुरु असून कोट्यावधी रुपयांची वार्षिक उलाढाल या खात्यावरुन दोन नंबरची एक नंबरमध्ये सुरु असल्याची जोरदारपणे रंगत आहे.    
     लहान विद्यार्थ्याना पळवून नेऊन एक तर मोठ्या शहरात हॉटेलसारख्या धंद्यात, गटारींचे काम करण्यासाठी, केमिकल्सच्या कारखान्यांत, अतिशय उग्र घाणीच्या ठिकाणी अथवा ज्या ठिकाणी जीवाला धोका होईल अशा ठिकाणी कामाला जुंपायचे, त्यांच्या मानवी अवयवांची तस्‍करी करायची अशा स्वरुपाचे गंभीर गुन्हे घडण्‍याची शक्‍यता वर्तवली जात आहे.  सदरील प्रकरण  गांभीर्याने घेऊन  शोध घेतल्यास मोठ्या टोळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.
    याबाबत बाशी पोलिस ठाण्याचे निरीक्षक सालार चाऊस यांना विचारणा केली असता याबाबत अद्यापपर्यंत आपल्याकडे कोणीही तक्रार घेऊन आले नसून योग्य ती तक्रार दाखल केल्यावर तपास करु असे म्हटले आहे.
 
Top