उस्मानाबाद -: शालेय स्‍तरावरच विद्यार्थ्‍यांना वाहतुक नियमांची माहिती होण्‍याकरीता उस्‍मानाबाद जिल्‍ह्यात राबविण्‍यात आलेला अभिनव उपक्रम आता राज्‍यभर राबविण्‍यात येणार आहे. महाराष्‍ट्र शासनाने या उपक्रमाची दखल घेऊन परिवहन उपयुक्‍तांनी 'उस्‍मानाबाद पॅटर्न' राबविण्‍यासाठी राज्‍यातील सर्व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला दि. 10 ऑक्‍टोबर रोजी पत्र दिले आहे.
        उस्‍मानाबादचे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी शालेय स्तरावरच विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे ज्ञान मिळावे, यासाठी सोप्या भाषेत वाहतुकीची नियमावली तयार केली होती. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी या विषयाचा क्रमिक अभ्यासक्रमामध्ये समावेश करावा, अशा सूचना जिल्हा परिषदेला केल्या होत्या. या सूचनेवरून जिल्हा परिषदेने 2 मार्च 2012 रोजी शालेय स्तरावर अभ्यासक्रम सुरू करण्याचे आदेश निर्गमित केले. सर्व शिक्षा विभागाच्या निधीतून 40 पानांच्या या पुस्तिकेची छपाई करण्यात आली. त्यानंतर शिक्षण विभागातील कर्मचार्‍यांना अभ्यासक्रमाच्या अध्यापनाबाबत प्रशिक्षण देण्यात आले. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक, माध्यमिक आणि कांही प्रमाणात खासगी शाळांमध्ये जूनपासून (2012) या अभ्यासक्रमाची सुरुवात झाली. प्रशिक्षण दिलेल्या शिक्षकांनी कार्यानुभव तासामध्ये रस्ता सुरक्षा विषयाचे विद्यार्थ्यांना धडे दिले. जिल्ह्यामध्ये या महत्त्वाच्या विषयाची सर्वप्रथम सुरुवात झाल्यामुळे उपप्रादेशिक परिवहन विभागाचे पालकांकडून कौतुक झाले. विद्यार्थ्यांनीही याचा अभ्यास उत्साहाने केला.
वाहतूक नियमांच्या अभ्यासक्रमाचा जिल्हा परिषद प्रशासनाकडून वेळोवेळी आढावा घेण्यात आला. त्यानंतर 10 आणि 21 जानेवारी 2013 रोजी प्रशासनाच्या आदेशानुसार 5वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांची चाचणी घेण्यात आली. पहिल्याच वर्षी सुमारे 1 लाख, 45 हजार विद्यार्थ्यांनी चाचणी दिली. 40 गुणांसाठी 20 प्रश्नांची ही चाचणी होती. 1300 विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी तर 90 टक्के विद्यार्थ्यांनी 40 पैकी 20 गुण मिळविल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
       शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेचा पाठ शिकविणार्‍या जिल्हा परिषद प्रशासनाने या नावीन्यपूर्ण उस्मानाबाद पॅटर्नची माहिती परिवहन विभागाच्या प्रधान सचिवांना 18 एप्रिल 2013 रोजीच्या एका पत्राद्वारे दिली होती. तसेच उस्मानाबाद जिल्ह्यात हा उपक्रम यशस्वी झाल्याचे कळविले होते. त्यानंतर प्रधान सचिवांनी परिवहन उपायुक्तांना उस्मानाबाद पॅटर्न राबविण्याबाबतचे पत्र दिले. परिवहन उपआयुक्तांनी 10 आक्टोबर 2013 रोजी राज्यातील सर्व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांना उस्मानाबाद पॅटर्नचे अवलोकन करून उचित कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.
       शासनाने दखल घेतलेल्या उस्मानाबाद पॅटर्नची सुरुवात करण्यासाठी शासनाने सर्व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांना पत्र दिले असून, परिवहन कार्यालयांमार्फत संबंधित जिल्हा प्रशासनाला क्रमिक अभ्यासक्रमासोबत वाहतूक सुरक्षेच्या अभ्यासक्रमाचा विचार व्हावा, असे पत्र देण्यात येणार आहे. त्यानंतर उस्मानाबाद जिल्हा परिषदेप्रमाणेच प्रशिक्षण देऊन शिक्षकांमार्फत या अभ्यासक्रमाची येत्या शैक्षणिक वर्षांपासून सुरुवात होण्‍याची शक्‍यता वर्तविली जात आहे.
 
Top