बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : आठ तालुके आणि दोन जिल्ह्याचे प्रचंड मोठे कार्यक्षेत्र असलेल्या बार्शी तालुक्यातील एकमेव सहकारी तत्वावरील असलेल्या भोगावतीचा भोंगा राजकिय हेतुने बंद पडला. शेतकर्‍यांनी व कारखान्याच्या कर्मचार्‍यांनी मनात आणल्यास सुरु करणे शक्य आहे. पांढरी शुभ्र साखर निर्मिती, चांगला उतारा, वजन काट्यावर काटेकोर वजन, शेतकर्‍यांच्या हिताची जोपासणूक आदि नावाने नावजलेल्या सहकारी साखर कारखान्याचे भोगावती नाव बदलून संतनाथ ठेवण्यात आले. परंतु नावात बदल करुनही साखर कारखान्याला लागलेले राजकीय ग्रहण संपले नाही. सन २००८ मध्ये कारखाना सुरु असतांना विविध कारणांसाठी कर्मचार्‍यांनी केलेल्या आंदोलनात विरोधी पक्षाच्या राजकिय नेत्यांशी हातमिळवणी केल्याने कामगारांच्या प्रश्‍नाला वेगळेच वळण लागले. कामगारांचा प्रश्‍न सोडवायचा, शेतकर्‍यांचा प्रश्‍न सोडवायचा, विरोधी पक्षाच्या कुरघोड्यांना थोपवायचे की कारखाना बंद करायचा या प्रश्‍नावर संचालकांनी शेवटचा तोडगा म्हणून संतनाथचा भोंगा बंद करण्याचा निर्णय घेतला.
    या विषयावर बोलतांना भाऊसाहेब आंधळकर म्हणाले, कारखाना बंद करण्याचा निर्णय झाल्यानंतर कर्जामुळे पुन्हा भाडेतत्वावर देण्याचा निर्णय झाला. यावेळी माढा तालुक्यातील राष्ट्रवादी पक्षाचे नेते संजय शिंदे यांना पाच वर्षासाठी हा कारखाना भाडेतत्वावर देण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु त्यांना दिला तर राजकिय गणिते बदलतील यामुळे पुन्हा तो निर्णय रद्द केला. पुन्हा एक वर्ष भाडेतत्वावर देण्याची निविदा काढण्यात आली. परंतु त्यांचा कोणीही चालविण्यास घेणार नाही व आपण तो विकू अथवा आपसात तो घेऊ असा कुटील डाव आम्ही हाणून पाडला व त्याची निवीदा आमच्या कंपनीतर्फे घेऊन एक वर्षासाठी चालविण्यास घेतला. यावेळी प्रत्यक्षात कारखाना सुरु करण्यासाठी आवश्यक असलेल्या अनेक गोष्टी त्या ठिकाणी नसल्याचे दिसून आले. सर्व वस्तू मोजदाद करुन ताब्यात देणे आवश्यक असतांना ते दिले नाही. यातील अनेक बाबींचा तपशील आम्ही न्यायालयाकडे केलेल्या तक्रारीत लेखी स्वरुपात मांडला आहे. सदरचा आजारी साखर देतेवेळी शासनाच्या आदेशाप्रमाणे ६ वर्षे चालविण्यास देण्याऐवजी मनमानी करुन १ वर्षे चालविण्यास देण्याची निविदा काढण्यात आली. सहकारी तत्वावरील साखर कारखाना चालू नये व आपले खाजगी तत्वावरील साखर कारखाने चांगल्या प्रकारे सुरळीत चालावे असा कुटील डाव सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील आणि सध्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा तत्कालीन भोगावतीचे चेअरमन दिलीप सोपल यांनी संगणमत करुन कारखान्याच्या कामगारांच्या व शेतकर्‍यांच्या हिताविरुध्द व स्वत:च्या स्वार्थासाठी कुटील कारस्थाने करुन कारखाना बंद पाडला. यापुढे आपण तीव्र आंदोलने करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
      या विषयावर बोलतांना कारखान्याचे कर्मचारी म्हणाले, भोगावती किंवा संतनाथ कारखान्याकडून सर्व प्रकारचे देणे असलेली रक्कम सुमारे ६० कोटी कर्ज स्वरुपात आहे. परंतु शेजारी असलेल्या तेरणा साखर कारखान्यावर ३०० कोटी रुपयांचे कर्ज असतांनाही तो सुरु आहे. याबाबत शासनाकडूनही वेगवेगळ्या धोरणे अवलंबिली जात आहे, याबाबत शंकाच आहे. सदरचा कारखाना कोणी चालविण्यात घेत नसेल तर सर्व कर्मचारी व शेतकरी मिळून आम्ही सक्षमपणे चालवू शकतो व सर्व प्रकारची देणीही देऊ शकतो असेही त्यांनी यावेळी सांगितले.
    सदरच्या कारखान्यावर अवलंबून असलेल्या कामगारांची अत्यंत बिकट परिस्थिती असून त्यांच्याकडे अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची शासकिय मदत पोहोचली नाही.
 
Top