उस्मानाबाद -: बँकेतून पाच लाख रुपये काढून दुचाकीवरून नेत असताना मागील बाजूने दुचाकीवरूनच आलेल्या दोन चोरट्यांनी पैसे ठेवलेली बॅग पळवली. ही घटना मंगळवार दि. 1 ऑक्‍टोबर रोजी दुपारी एक ते दीड वाजण्‍याच्‍या सुमारास शहरातील तुळजाभवानी क्रीडा संकुलाजवळ घडली.
    पाटबंधारे विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी रामलिंग शंकरराव कौलगे (61, रा. वरुडा रस्ता, उस्मानाबाद) यांनी मंगळवारी दुपारी एक वाजता येथील हैदराबाद बँकेच्या शाखेतून पाच लाख रुपये काढले. त्यांनी ही सर्व रक्कम एका बॅगमध्ये ठेवली. शहरातील यशवंत सहकारी पतसंस्थेमध्ये मुदत ठेवीवर ही रक्कम त्यांना ठेवायची होती. त्यांचा मुलगा गोविंद कौलगे याच्यासोबत दुचाकीवरून (एमएच 25, एस. - 5442) ते पतसंस्थेकडे निघाले. तुळजाभवानी क्रीडा संकुलमार्गे ते जात होते. संकुलाजवळ आल्यानंतर मागील बाजूने दुचाकीवरून अचानकच दोघेजण आले. दुचाकीचा वेग कमी करत मागे बसलेल्या व्यक्तीने डोळ्याचे पाते लवते न लवते तोच दोघांमध्ये ठेवलेली पैशाची बॅग हिसकावून घेतली. पुन्हा दुचाकीचा वेग वाढवून पोबारा केला. कौलगे यांनी ओरडून लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला. तसेच मुलगा गोविंद याने दुचाकीवरून त्यांचा पाठलाग केला. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आल्यानंतर चोरटे अचानक गायब झाले. याप्रकरणी कौलगे यांच्या फिर्यादीवरून येथील शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
    बँकेच्या शाखेत कौलगे यांच्यावर कोण पाळत ठेवत होते का, याची तपासणी करण्यासाठी बँकेकडून सीसीटीव्ही फुटेज हस्तगत करण्यात आले आहे. फुटेजची पाहणी पोलिस करीत आहेत. मात्र, रात्रीपर्यंत काहीही हाती लागले नाही. तसेच कौलगे यांच्या माहितीवरून एका चोरट्याचे रेखाचित्र रेखाटण्यात आले आहे. या चित्राची छापील प्रिंट बुधवारी (दि. 2) प्राप्त होणार आहे. दरम्यान कौलगे यांनी सांगितल्यानुसार दोघेही 30 ते 35 वयोगटातील होते. मागच्याने काळा तर पुढच्या चोरट्याने निळा शर्ट परिधान केला होता. बँकेतून रक्कम काढल्यानंतर चोरट्यांनी लंपास करण्याचे प्रकार यापूर्वीही घडले आहेत. हे सर्व प्रकार चोरट्यांच्या एकाच टोळीकडून होत असल्याची शक्यता आहे.
 
Top