नळदूर्ग : शहरातील किल्लागेट परिसरात अखिल भारतीय भ्रष्टाचार विरोधी न्यायमंचच्या वतीने दसरा, बकरी ईद व नवरात्रोत्सोवाच्या शुभेच्छा देण्यासाठी लावलेला फलक अज्ञात समाजकंटकांनी फाडल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. यावेळी मंचच्या वतीने पोलिसांना निवेदन देऊन पंधरा दिवसात आरोपींना अटक करण्याची मागणी करण्यात आली. आरोपींना अटक न केल्यास 2 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
    किल्लागेटच्या समोरील बाजूस अखिल भारतीय भ्रष्टाचार विरोधी सामाजिक मंचच्या वतीने हिंदू बांधवाना दसरा व नवरात्रोत्सोवाच्या तर मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देणारा फलक लावला होता. परंतु हा फलक 17 ऑक्टोबरच्या मध्यरात्री अज्ञात समाजकंटकाने फाडला. हा प्रकार लक्षात येताच शुक्रवारी सकाळी शहरात तणाव निर्माण झाला. यावेळी मंचच्या पदाधिकार्‍यांनी नळदुर्ग पोलिस ठाण्याचे प्रभारी उपनिरीक्षक प्रकाश गायकवाड यांना याप्रकरणी निवेदन देऊन आरोपींना पंधरा दिवसांत अटक करण्याची मागणी केली. निवेदनावर जिल्हाध्यक्ष रामभाऊ कांबळे, मोईन शेख, चंद्रकांत गायकवाड, खुशालसिंह ठाकूर आदींच्या स्वाक्षरी आहेत.
 
Top