मुंबई : पत्रकारांना दुर्धर आजार, अपघात झाल्यास किंवा आकस्मिक मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीतून देण्यात येणा-या आर्थिक मदतीत वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तसेच या योजनेंतर्गत काही नवीन आजारांचाही समावेश करण्यात आला आहे.
       शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीतून पत्रकार किंवा त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात येते. 1 ऑक्टोबर 2013 च्या शासन निर्णयानुसार पत्रकारांना देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीत वाढ करण्यात आली असून आजाराचे स्वरुप, सध्या देण्यात येणारी रक्कम व सुधारीत आर्थिक मदत पुढील प्रमाणे आहे.
      हृदय शस्त्रक्रिया, हृदय उपमार्ग शस्त्रक्रिया, मुत्रपिंड निकामी होणे/ मुत्रपिंड/ शरीरातील अन्य अवयव प्रतिरोपण शस्त्रक्रिया, रक्ताचा/ इतर कर्करोग, पत्रकाराचे दुर्धर आजारामुळे आकस्मिक निधन झाले किंवा अपघाती निधन झाल्यास त्यांच्या कुंटुंबियास देण्यात येणारी सध्याची रक्कम रु. 50 हजारावरुन रु. 1 लाख करण्यात आली आहे.
          अँन्जोप्लास्टी शस्त्रक्रिया, अपघातामुळे एक हात किंवा पाय गमवावा लागलेल्या पत्रकाराच्या बाबतीत सध्याची आर्थिक मदत रु. 50 हजारावरुन 75 हजार रुपये करण्यात आली आहे.
         हृदयविकाराचा झटका आल्यास 15 हजारावरुन 75 हजार, ब्रेन ट्युमर, अपघाती भाजणे, मज्जारज्जू (स्पायनल कॉड) संबंधात आकस्मिक आजार, गंभीर मानसिक आजार (स्किझोफ्रेनिया, डिप्रेशन, बायपोलार, डिसॉर्डर), डोळ्यातील दृष्टीपटल सरकणे, स्त्री रोग शास्त्र आणि प्रसुती शास्त्रासंबंधी आकस्मिक आजार, यासाठी सध्याची मदत रु. 15 हजारा वरुन 50 हजार रुपये करण्यात आली आहे. मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी 15 हजार रुपये एवढीच रक्कम ठेवण्यात आली आहे.
         या योजनेत पुढील नवीन आजारांचा समोवश करण्यात आला आहे. गुडघा प्रत्यारोपण रु. 50 हजार, मेंदूतील रक्तवाहिन्यांचे विकार प्रमस्तिष्क संहनी रु. 75 हजार, व्याश्लेषण अपोहन (डायलसिस) रु. 75 हजार, पोटाच्या विकाराच्या शस्त्रक्रिया/ अन्य शस्त्रक्रिया (पित्ताशयातील खडे, अपेंडिक्स) रु. 50 हजार, मुत्रपिंडाशी संबंधित विकार (हर्निया, युरिन इन्फेक्शन) रु. 50 हजार, कॉक्लेरीन इम्प्लॉट (कानाची शस्त्रक्रिया) रु. 1 लाख तर कायम अपंगत्वासाठी रु. 1 लाख रुपये देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
  याबाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेतांक 201310011107125907 असा आहे.
 
Top