बार्शी : रुग्णालयाचा तपासणी अहवाल घेऊत घराकडे परत येणार्‍या वृध्द महिलेचे दागीने लंपास करुन फसवूणक करणार्‍या तोतया पोलिसांच्या विरोधात बार्शी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवार दि. 23 रोजी सकाळी साडे नऊ वाजण्‍याच्‍या सुमारास घडली.
    शारदाबाई सिद्राम हलगे (वय ६५, रा. आगळगाव रोड, बार्शी) असे या फसगत झालेल्या महिलेचे नाव आहे. बुधवारी दि. २३ रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास खासगी रुग्णालयाकडून तपासणी अहवाल घेऊन परत येतांना सुभाष नगर परिसरात सदरचा प्रकार घडला आहे. यातील दोघा तोतया पोलिसांनी सोन्यासाठीच येथे खून झाला असून आपण त्या तपास कामी आलो, आम्ही साध्या वेशातील पोलीस आहोत, तुम्ही कशाला सोने घालून फिरता या कागदात गुंडाळून तुमचे सोने तुमच्या पिशवीत ठेवा, असे म्हणून तिच्याकडील सोन्याचे दागिने आपल्या हाताने कागदात गुंडाळून पिशवीत ठेवल्यासारखे केले आणी हातोहात फसविले. हातचलाखी करुन त्या दोघांनी कागदामध्ये दगड आणि मरती बांधून पिशवीत ठेवल्याचे फसवणूक झाल्यानंतर त्या महिलेस समजले.  फसवणूक करुन ताबडतोब दुचाकीवर दोघे भामटे पसार झाल्याने महिलेला कोणत्याही प्रकारची हालचाल करता आली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सदरच्या महिलेने जीन्सची पॅन्ट, फल शर्ट, मराठी भाषा अवगत असलेले दोघेजण समोर आल्यास त्यांना ओळखू शकते, अशी लेखी तक्रार बार्शी पोलिसांत दाखल केली आहे. सदरच्या तक्रारीवरुन बार्शी पोलिसांत फसवणूकीचा गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास हवालदार बनसोडे हे करीत आहेत.
    अशा प्रकारच्या घटना बार्शी शहरात सातत्याने घडत असून यावर कोणतीही ठोस उपाययोजना झाल्याचे दिसून येत नाही. अनेक दुचाकीस्वार गुन्हेगारी प्रवृत्तीसारखे फिरत असून अनेकांच्या वाहनांना नंबरप्लेट देखिल नाहीत. दोन दिवसांपूर्वीच एका दुचाकीवरुन शाळकरी मुलाचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाला, मागील तीन चार वर्षात अनेकांचे सोन्याचे दागीने ओढून पळवून नेल्याच्या घटना घडल्या आहेत, वाहतूक पोलिस सदरच्या वाहनांवर कारवाई करण्याचा प्रयत्न करत असतांना मात्र राजकिय व्यक्तींचा हस्तक्षेप होतो आणि कोणत्याही कारवाईशिवाय वाहन चालकांना सोडून देण्याच्या घटना घडतात. एक दोन वेळा तर गुंड प्रवृत्तींच्या व्यक्तींकडून वाहतूक पोलिसांना मारहाण झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. रात्री अपरात्री तोंडाला रुमाल बांधून भरधाव वेगाने दुचाकीवरुन जाणार्‍या संशयीतांचे प्रमाणही वाढले आहे. अनेकांच्या वाहनांना मोठ्या आवाजाचे हॉर्न असून एकेरी मार्ग, बेशिस्त वाहने लावणे, लायसन नसणे, अल्प वयाच्या मुलांकडून वाहने चालविणे अशा अनेक घटना समोर येतात. परंतू कारवाई करतांना वाहतूक पोलिसांना अनेक अडचणी येत असल्याचे वारंवार दिसून येत आहे.
 
Top