उस्मानाबाद -: इयत्ता दहावी व बारावी परीक्षेस प्रविष्ठ होऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची श्रेणी सुधारण्यासाठी पुन्हा परीक्षेस बसण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ही संधी सलग दोन परीक्षेस प्रविष्ठ होण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आली होती. त्यामध्ये पहिली संधी अनिवार्य व दुसरी संधी जादाची उपलब्ध करुन देण्याची तरतुद होती. परंतु विद्यार्थी, पालक, शाळा व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या मागणीनुसार या योजनेत अंशत: बदल करण्यात आला असून इयत्ता दहावी व बारावी परीक्षेत एकाच वेळी सर्व विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांस लगेच येणाऱ्या लगतच्या परीक्षेसाठी पहिली संधी, त्यानंतर येणाऱ्या लगतच्या परीक्षेसाठी दुसरी संधी उपलब्ध असेल (उदा. ऑक्टोबर व मार्च ) पहिल्या संधीचा लाभ उमेदवाराने न घेतल्यास त्यास दुसरी संधी उपलब्ध असेल मात्र ही संधी अंतिम असेल. या संधीनंतर त्यास या योजनेनुसार पुन्हा परिक्षेस प्रविष्ठ होता येणार नाही व तशी मागणी करता येणार नाही. सदर योजनेतील अन्य नियमात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे विभागीय सचिव, लातूर विभागीय मंडळ, लातूर यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे.