कोल्‍हापूर -: शारदीय नवरात्र महोत्‍सवाच्‍या पार्श्‍वभूमीवर मंदिरातील तयारीला वेग आला आहे. मंदिर परिसर स्‍वच्‍छता, रंगरंगोटीचे काम पूर्ण झाल्‍याने दर्शन रांगेसाठी मंडप उभारणीस प्रारंभ झाला. तसेच मंदिराला चोहोबाजूंनी उजळून टाकण्‍यासाठी विद्युत रोषणाई करण्‍यात आली आहे. सायंकाळी विद्युत रोषणाईचे काम पूर्ण झाल्‍यानंतर ट्रायल घेण्‍यात आली. यावेळी नवरात्रोत्‍सवासाठी नवलाईने सजलेल्‍या मंदिराचे रुप भाविकांनी क्षणात डोळ्यात साठविले.
    गेले सहा-सात दिवस म‍ंदिराची अंतर्बाह्य स्‍वच्‍छता करण्‍यात आली. यासाठी दरवर्षीप्रमाणे संजय मेन्‍टनन्‍सच्‍या स्‍वयंसेवकांनी मोलाचे योगदान दिले. मंदिर परिसरातील दीपमाळेसह, शिखर, बाह्यशिल्‍प, मंडप स्‍वच्‍छतेचे काम त्‍यांनी पूर्ण केले आहे. गरुड मंडप व अन्य ठिकाणचे रंगकामही पूर्ण झाले आहे. आजपासून दर्शन रांगेचा मंडप उभारण्‍यास प्रारंभ झाला. दर्शनासाठी रांगेत उभारणा-या भाविकांना जास्‍तीत जास्‍त सोयीसुविधा देण्‍यासाठी यावर्षी महालक्ष्‍मी भक्‍त मंडळाने पुढाकार घेतला आहे. उन्‍हापासून संरक्षणासाठी दरवर्षीप्रमाणे आज दर्शन रांग मंडप उभारणीस सुरुवात करण्‍यात आली. सरलष्‍कर भवनसमोरील जागेत मंडप उभारला जाणार आहे. दर्शन रांगेत उभारल्‍या भाविकांना देवीचे रुप डोळ्यात साठवता यावे, यासाठी एलसीडी स्‍क्रीनही उभारली जाणार आहे.
 
Top