नळदुर्ग -: शहराच्‍या उत्‍तर दिशेला बोरी नदीच्‍या काठ्यावर असलेल्‍या श्री जगदंबादेवी (अंबाबाई) मंदिरात नवरात्र महोत्‍सवानिमित्‍त खास शालेय विद्यार्थ्‍यांसाठी सामान्‍य ज्ञान परीक्षेचे आयोजन करण्‍यात आले होते. या स्‍पर्धेस शहर व परिसरातील दहा शाळेच्‍या विद्यार्थ्‍यांतून उत्‍स्‍फुर्तपणे प्रतिसाद मिळाला. स्‍पर्धेच्‍या युगात सर्वसामान्‍य विद्यार्थी यशस्‍वी होण्‍यासाठी अशा स्‍पर्धात्‍मक परीक्षेची गरज ओळखून संयोजकांनी सामान्‍य ज्ञान परीक्षाचे आयोजन करुन विद्यार्थ्‍यांना बौध्‍दीक  चालना देण्‍याचे कौतुकास्‍पद उपक्रम राबविल्‍याबद्दल सर्वत्र संयोजकांचे अभिनंदन केले जात आहे. 
श्री जगदंबादेवी (अंबाबाई) देवस्‍थान ट्रस्‍ट संचलित श्री अंबाबाई मंदिर जिर्णोध्‍दार समितीच्‍यावतीने नवरात्र महोत्‍सवानिमित्‍त विविध उपक्रम राबविण्‍यात येत आहे. गुरुवार रोजी सामान्‍य विज्ञान परीक्षा घेण्‍यात आली. यामध्‍ये 300 विद्यार्थ्‍यांनी उत्‍स्‍फुर्तपणे आपला सहभाग नोंदविला. त्‍यामध्‍ये नळदुर्ग शहरातील जिल्‍हा परिषद (मुलांची) प्रशाला, जिल्‍हा परिषद कन्‍या प्रशाला, अंजनी प्रशाला, नॅशनल माध्‍यमिक शाळा, आपलं घर आलियाबाद, हुतात्‍मा बाबुराव बोरगांवकर माध्‍यमिक शाळा साखर कारखाना, जवाहर विद्यालय अणदूर आदी शाळेतील विद्यार्थ्‍यांचा समावेश आहे. सामान्‍य ज्ञान परीक्षेत एकूण पन्‍नास प्रश्‍न होते. विद्यार्थ्‍यांना पेपर संपल्‍यानंतर मंदीर समितीच्‍यावतीने खाऊ वाटप करण्‍यात आले. परीक्षा यशस्‍वी करण्‍यासाठी विनायक अहंकारी, अमृत पुदाले, शरद बागल, सौरभ रामदासी, सरदारसिंग ठाकूर, सुधीर हजारे, सुरेश गायकवाड, रमेश जाधव, स्‍वामी एस.आर., गवळी एस.डी., बिराजदार पी.ए., जगन्‍नाथ जाधव, दौलतराव मोरेपाटील आदीनी परीश्रम घेतले.
    नवरात्र महोत्‍सवानिमित्‍त घेण्‍यात आलेल्‍या विविध स्‍पर्धेंचे पारितोषिक वितरण शनिवार दि. 12 ऑक्‍टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता पालकमंत्री ना. मधुकरराव चव्‍हाण यांच्‍या हस्‍ते करण्‍यात येणार आहे. या कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी लातूर येथील सिध्‍देश्‍वर सहकारी बँकेचे चेअरमन सि.ना. आलुरे गुरुजी तर प्रमुख अतिथी म्‍हणून दृष्‍टी शुगर ग्रुपचे संस्‍थापक अध्‍यक्ष अशोकरराव जगदाळे हे उपस्थित राहणार आहेत.
 
Top