नळदुर्ग -: ना. मधुकरराव चव्‍हाण चॅरिटेबल ट्रस्‍टच्‍यावतीने श्री क्षेत्र तुळजापूरला पायी चालत जाणा-या भाविकांसाठी श्री तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखान्‍यासमोर मोफत औषधोपचार केंद्र उघडण्‍यात आले आहे. हा स्‍तुत्‍य उपक्रम गेल्‍या बारा वर्षापासून
राबविण्‍यात येत आहे. गेल्‍या तीन दिवसात तीन ते चार हजार अनवाणी पायी चालत जाणा-या महिला, पुरुष भाविक भक्‍तांची आरोग्‍य तपासणी करुन त्‍यांच्‍यावर वैद्यकीय अधिका-यांनी मोफत औषधोपचार केले.
    शारदीय नवरात्र महोत्‍सवाचे औचित्‍य साधून राज्‍यासह परप्रांतातून महिला, पुरुष भाविक मोठ्याप्रमाणावर श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्‍यासाठी नळदुर्ग मार्गे तुळजापूरकडे जातात. त्‍याचबरोबर अनवाणी पायी चालत जाणा-या भाविकांच्‍या संख्‍येत दिवसेंदिवस लक्षणीय वाढ झाल्‍याचे दिसून येत आहे. शेकडो किलोमीटर पायी चालत जाणा-या भाविक भक्‍तांचे पाय रक्‍तबंबाळ होतात. पायावर सूज येणे यासह इतर आरोग्‍याची तक्रारी भाविकांच्‍या असून त्‍या पार्श्‍वभूमीवर विद्यमान राज्‍याचे पशुसंवर्धन, दुग्‍धविकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री तथा उस्‍मानाबाद जिल्‍ह्याचे पालकमंत्री ना. मधुकरराव चव्‍हाण यांनी गेल्‍या दहा ते बारा वर्षापूर्वीपासून तुळजापूर रस्‍त्‍यावरील श्री तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखान्‍यासमोर भव्‍य मोफत औषधोपचार केंद्र उघडून भाविक भक्‍तांवर मोफत औषधोपचार केले जात आहे. या औषधोपचार केंद्राचे उदघाटन नळदुर्ग प्राथमिक आरोग्‍य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कोळ्ळे,  अणदूर प्राथमिक आरोग्‍य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बिराजदार यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. याप्रसंगी श्री तुळजाभवानी साखर कारखान्‍याचे व्‍हा. चेअरमन सुनील चव्‍हाण, डॉ. यत्‍नाळकर, राजू पाटील, प्रसाद देशमुख, वैद्यकीय कर्मचारी, भाविक आदी उपस्थित होते.
    सोमवार दि. 7 ऑक्‍टोबर रोजी ना. मधुकरराव चव्‍हाण चॅरिटेबल ट्रस्‍टच्‍यावतीने उघडण्यात आलेल्‍या मोफत औषधोपचार केंद्रात अवघ्‍या तीन दिवसात जवळपास चार हजार भाविकांवर औषधोपचार करण्‍यात आले आहे. या औषधोपचार केंद्रात चांगल्‍या दर्जोचे औषधे उपलब्‍ध असून परिसरातील अनेक प्राथमिक आरोग्‍य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांनी विशेष पुढाकार घेऊन पायी चालत जाणा-या भक्‍तांवर उपचार करीत आहेत. त्‍यामुळे पायी चालत जाणा-या भक्‍तांना मोठा दिलासा मिळत असून या सेवेबद्दल भाविकांतून समाधान व्‍यक्‍त केले जात आहे.
 
Top