मुंबई : आयआयटी पवई येथे सुरु झालेले 'सेंटर फॉर अर्बन सायन्स अँड इंजिनिअरींग' राज्यातील तसेच प्रामुख्याने मुंबईच्या शहरीकरणातील विविध समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. या केंद्रासाठी शासन सर्वतोपरी मदत करील, अशी ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
      सेंटर फॉर अर्बन सायन्स अँड इंजिनिअरींग (C-USE) च्या उद्‌घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोमवारी झाले. त्यावेळी ते बोलत होते. आयआयटीच्या बोर्ड गव्हर्नन्सचे अध्यक्ष डॉ.अनिल काकोडकर, केंद्रीय मनुष्यबळ विकास संसाधन मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव श्रीमती अमिता शर्मा, आयआयटी मुंबईचे संचालक प्रो.डी.व्ही.खकार यावेळी उपस्थित होते.
     या केंद्राकडून शासनास मदत मिळावी अशी अपेक्षा करुन मुख्यमंत्री म्हणाले, मुंबईसह राज्याच्या इतर भागात शहरीकरणाची मोठी समस्या असल्याने मनुष्यबळ प्रशिक्षणासाठी हे केंद्र अत्यंत महत्त्वाचे आहे. नगरविकास विभाग माझ्याकडे असल्यामुळे या संदर्भातील विविध समस्यांची मला चांगली जाण आहे, असे सांगून त्यांनी या विभागातील विविध समस्यांचा आढावा घेतला. पर्यावरण, इमारतींची उंची, डीसीआर नियम यांची अंमलबजावणी व त्यात येणाऱ्या अडचणी यांचाही ऊहापोह त्यांनी यावेळी केला. याबाबत लवकरच राज्यातील महानगरपालिका आयुक्तांसह संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावून येणाऱ्या अडीअडचणींचा विचार करण्यात येईल. केंद्र सरकारने देखील याबाबत लक्ष घालावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
      या कार्यक्रमात सी-यूज या सर्व्हिस केंद्राचे प्रमुख प्रो.कृथी रामामृथम यांनी केंद्र उभारण्यामागची भूमिका स्पष्ट केली. शहरीकरणात येणाऱ्या विविध समस्यांच्या निराकरणासाठी हे केंद्र संशोधन करणार असून कुशल मनुष्यबळ, प्रशिक्षण तसेच डाटा संकलन व त्यावर संशोधन आणि दर्जात्मक निर्मिती यासाठी हे केंद्र मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी डॉ.अनिल काकोडकर, विद्यासागर पाठक, अमिता शर्मा यांचीही समयोचित भाषणे झाली.
      यावेळी या क्षेत्रातील मान्यवर, प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top